जळगाव : (Eknath Shinde On Eknath Khadse) माजी मंत्री आणि २०१४ चे भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार एकनाथ खडसे यांना पक्षानं डावल्यामुळं त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यापलिकडे त्यांना पक्षातून हिन वागणूक देण्यात आली. २०१९ ला तर त्यांना विधानसभेचं तिकीटही दिलं नाही. या सर्व जाचाला कंटाळून अखेर त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून करण्यात आला. परंतू तिथं ही नऊ महिने उलटले तरी राज्यपालांनी या नियुक्त्या रखडल्या.
दरम्यान, त्यांतर संघर्षातून ते नुकतेच विधानपरिषदेतून आमदार झाले. त्यामुळं ते पुन्हा मंत्री होणार असा आंदाज वर्तवला जात होता. मात्र, दुसऱ्या एकनाथाने म्हणजेच सेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी नाथाभाऊंचा मंत्रिपदाचा पुन्हा अपेक्षा भंग केला आहे. त्यामुळे एका एकनाथाची मुख्यमंत्रिपदी लॉटरी लागली असताना दुसऱ्या एकनाथांच्या स्वप्नावर नांगर फिरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून त्यांचा मान राखत विधान परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची निवड करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, ज्या दिवशी खडसे आमदार म्हणून निवडून आले, त्याच दिवशी त्यांच्या स्वप्नांना ग्रहण लागलं. त्याच रात्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह बंड पुकारलं. त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं व सोबत खडसे यांच्या मंत्रिपदाच्या शक्यतांनाही पूर्णविराम लागला.