नवी दिल्ली : जर यूएस-आधारित ईव्ही निर्माता टेस्लाने भारतात आपली इलेक्ट्रिक वाहने तयार करत असेल तर कंपनीलाही त्याचा फायदा होईल, असे मत केंद्रीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. यावेळी ते असेही म्हणाले की, दिवस दूर नाही जेव्हा देशातील सर्व इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांच्या किमतीपेक्षा कमी असतील असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. गेल्या वर्षी, अवजड उद्योग मंत्रालयानेदेखील टेस्लाला कोणत्याही कर सवलतीचा विचार करण्यापूर्वी भारतात आपल्या प्रतिष्ठित इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करण्यास सांगितले होते. नवी दिल्लीतील एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.
गडकरी म्हणाले की, जर इलॉन मस्क भारतात ईव्ही वाहनांचं उत्पादन करण्यास तयार असतील तर कोणतीही अडचण नाही. भारतात या, उत्पादन सुरू करा, भारत एक मोठी बाजारपेठ आहे, ते भारतातून निर्यात करू शकतात, असे त्यांनी एका संवाद सत्रात सांगितले होते. तर त्यापूर्वी म्हणजे 26 एप्रिल रोजी गडकरींनी जर टेस्ला भारतात ईलेक्ट्रिकल वाहनं तयार करण्यास तयार असेल तर काही अडचण नसल्याचे म्हटले होते, परंतु कंपनीने चीनमधून कार आयात करू नये, असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यानंतर आज त्यांनी जर कंपनीने भारतात ईव्ही तयार केल्यास फायदा होईल असे मत व्यक्त केले आहे.
टेस्ला भारतात कार बनवण्याऐवजी येथे आयात केलेल्या कार विकू इच्छित आहे. भारत सरकारने इलेक्ट्रिक कारवरील आयात शुल्क कमी करावे, असे टेस्लाने अनेक मंचांवर म्हटले आहे. तथापि, अवजड उद्योग मंत्रालयाने टेस्लाला कडक शब्दात सांगितले आहे की, टेस्ला भारतात येईल आणि आधी कार बनवेल, त्यानंतर सवलतींचा विचार केला जाईल.