पिंपरी : नृत्यकला मंदिरतर्फे आयोजित केलेल्या ’नृत्यांजली’ या शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमात नृत्याविष्कार पाहून उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले होते. हा कार्यक्रम निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयातील मनोहर वाढवकर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार आणि प्राध्यापक डॉक्टर संजीवनी पांडे उपस्थित होते. यावेळी गुरू व नृत्यकला मंदिरच्या संचालिका तेजश्री अडिगे यांच्या मार्गदर्शनाखाली ७५ विद्यार्थिनींनी भरतनाट्यम नृत्य प्रकारातील विविध कलाविष्कार सादर केले. यात सात वर्षांपुढील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाची सुरुवात ही श्लोकम आणि पुष्पांजली या रचनेने झाली.
विद्यार्थिनींनी नट्ट…मेट्ट..कुदित सरक्क अडवू अशा भरतनाट्यमच्या विविध संरचनात्मक पदन्यास, तसेच अलारीपू.. गणेशगीतम.. जतीस्वरम.. कृष्णवर्णम अशा अभिनय आणि नृत्य यांच्या संगम असलेल्या विविध रचनांचे तालबद्ध सादरीकरण केले. कार्यक्रमासाठी गायन शिवप्रसाद मृदंग वादन, वेंकटरामन, व्हायोलिन वादन अजय चंद्रमौळी या वाद्यवृंदाचे सहकार्य लाभले. मार्गदर्शक गुरू तेजश्री अडिगे यांनी पढंत आणि तालवादन केले. नृत्यासाठी साहाय्य संस्कृती मगदूम, कृतिका मीनाक्षी, अनुष्का बैरागी, कुमुदिनी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी, तर आभार अविनाश अडिगे यांनी मानले.