कोथरूडमधील व्यवसायिकांचा पदपथांना विळखा; पादचाऱ्यांना चालणे झाले अवघड

कोथरूडमधील व्यवसायिकांचा पदपथांना विळखा

कोथरुड मधील किनारा हॉटेल, शिक्षकनगर, शिवतीर्थनगर या परिसरात मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील पदपथांवर अनधिकृत हातगाडी व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली असून पदपथावरून पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले आहे. पदपथावरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्याकडेने जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे, त्यामुळे अशा पदपथांवरील अनधिकृत हातगाड्यांवर महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भातील मागणीचे निवेदन मनसेचे शाखा अध्यक्ष किरण उभे यांनी कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांना दिले आहे. तातडीने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या भागात लागणाऱ्या अनधिकृत हातगाड्या, परवानेधारकांचे स्थिर, अस्थिर पत्ते, परवान्यावर असणाराच व्यवसाय होतोय का ? फूड लायसेंस अशा अनेक गोष्टी तपासून घेऊन बेकायदेशीर ठिकाणी कारवाई करण्यात यावी आणि कारवाईचा अहवाल द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. किरण उभे यांनी सांगितले की चालू असलेल्या अनधिकृत हातगाड्या या परप्रांतीयांच्या आहेत. या अनधिकृत हातगाड्यांना कोणाचा आशीर्वाद मिळत आहे हा मोठा प्रश्न. असून पालिका प्रशासनही त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

Rashtra Sanchar: