विस्तारवादी संस्कारित जीवनाचा ऊर्जास्रोत : सौ. ऊर्मिलाकाकू

स्वार्थाला, मोहाला बुद्धी चिकटून बसली, की आंतरिक मन व्यावहारिक भाषेच्या परिणामात गुंतून जाते. हे प्रत्येक माणसाच्या जीवनातील वास्तव्य असले तरी अध्यात्म असे सांगते, याबाबत श्री ज्ञानोबाराय म्हणतात, ‘अर्जुना, समत्वचित्ताचे। तेचि सार जाण योगाचे। जेथ मन आणि बुद्धिचे। ऐक्य आधी॥’ साधनेतील हा भाग कठीण असला तरी प्रत्येक मुमुक्षुला ध्यान योग साधणे शक्य होत नाही. परंतु परमात्म्याच्या ठिकाणी चित्त स्थिर ठेवणे ही ध्यानयोगाची सर्वश्रेष्ठ उपलब्धी आहे. समाजजीवनात अशा भक्तांची मांदियाळी पाहिली, की माऊलींचे हे शब्द अशा व्यक्तींच्या जीवनाची एक ऊर्जा बनलेली दिसतात. एमआयटीचे संस्थापक आणि आध्यात्मिक क्षेत्रात विशिष्ट प्रकारच्या उंचीला स्पर्श करूनसुद्धा दांभिकतेला यत्किंचितही स्पर्श न केलेले विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ कराड यांच्या पत्नी सौ. ऊर्मिला कराड यांचे शुक्रवारी (दि. २० जुलै) दु:खद निधन झाले. त्यांना वाहिलेली शब्दसुमनांजली…

आध्यात्मिक परिभाषेची आपल्या अंत:करणात जाणीव करून ठेवलेल्या सौ. ऊर्मिलाकाकू खऱ्या अर्थाने पारमार्थिक, आध्यात्मिक इतकेच नव्हे, तर कौटुंबिक, सामाजिक जीवनाचा एक आर्त स्वर होत्या. सौ. काकूंचे माहेर गोदावरीच्या कुशीत होते, इतकेच नव्हे, तर त्यांचे तीर्थरुप हाडाचे शिक्षक होते. त्यामुळे कौटुंबिक आणि आध्यात्मिक संस्कारांची त्यांच्यावर एक वेगळी छाप होती. मुळात एका आध्यात्मिक घराण्यात वारकरी सांप्रदायिक संस्कार उपजत ज्यांच्या घरात आहेत, त्या घरात सौ. ऊर्मिलाकाकूंंचा जन्म झाला आणि ईश्वरकृपेच्या योगायोगाने संतपरंपरेच्या शिकवणुकीचे पाईक असलेल्या कराड घराण्यात त्यांचे कौटुंबिक ऋणानुबंध जुळले गेले. जन्मघरी मिळालेल्या संस्कारांची शिदोरी पतीच्या घरी सोडून आनंदाच्या कृतार्थतेने जीवन जगण्याचे एक वेगळे परिमाण सौ. काकूंंना साधण्याचा योग आला, ही त्यांच्या जीवनातील एक विलक्षण बाब मानली गेली पाहिजे.

संसारिक सुखाची नैसर्गिक उपलब्धी लाभूनसुद्धा जीवनात परमात्म्याच्या ठायी चित्त स्थिर करून ध्यानयोगाची सर्वश्रेष्ठ उपलब्धी करून घेणे हा योगायोग क्वचित ठिकाणी दिसून येतो. एमआयटीसारख्या सर्व क्षेत्रात हिमालयाची उंची गाठलेल्या एका शिक्षण संस्थेच्या वास्तुला जगन्मान्यता मिळत असताना सौ. ऊर्मिलाकाकूंंचे जीवन हे सांप्रदायिक, संस्कारित मार्गाने गेल्याचे दिसते, यावरून त्यांच्या अंत:करणातील आध्यात्मिक ऊर्मीची जाण किती सखोल रुजली होती, याची जाणीव त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरून दिसून येते. मागील वर्षाच्या नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याच्यादरम्यान हिमालयातील भारताचे अखेरचे गाव असलेल्या माणा गावात विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ कराड यांनी आयोजिलेल्या एका कार्यक्रमासाठी जाण्याचा योग आला. त्यावेळी श्री. कराड कुटुंबीयांच्याबरोबर सौ. ऊर्मिलाकाकूंंचाही त्यात अत्यंत उत्साहपूर्ण सहभाग होता. माणा गावाला जाताना साधारण दोन-अडीच किमीची जी पर्वतरांग चढून जावी लागते, ती तशी खडतर आहे. पण थांबत थांबत जाताना जी एक वेगळी आध्यात्मिक अनुभूती येत असते त्या अनुभूतीची व्याप्ती किती विशाल असू शकते, हे स्व. सौ. ऊर्मिलाकाकूंंच्या मुखातून ऐकण्याचे भाग्य या अस्मादिकाला लाभले.

एका चढणावर त्या बसल्या असताना मीही थकलेल्या अवस्थेत त्या रस्त्यावरून जात असतानाच मलाही त्यांनी थोडा वेळ बसण्याचे सुचविले. त्यावेळेस दोन माणा गावातील भगिनी त्यांच्यासमोर लोकरीच्या काही वस्तू घेऊन आल्या. त्या वस्तू त्यांनी न घेताच आपल्याजवळची एक शंभरची नोट काढून त्या भगिनीच्या हातात ठेवली, तेव्हा त्या भगिनीच्या डोळ्यात अश्रू आल्याचे जेव्हा मला जाणवले, तेव्हा सौ. ऊर्मिलाकाकू संभाषण करताना म्हणाल्या, ‘बडवेमहाराज, निसर्गाच्या सान्निध्यात राहून मनावरचा त्यांचा आनंद द्विगुणित होत असेल म्हणजे पोटातील भूक असते ती शमविण्यासाठी त्यांना हे करावेच लागते. परमेश्वराने निर्माण केलेली भूक नावाची नैसर्गिक गरज ही फक्त आणि फक्त ती शमविण्यासाठी त्याला शांत करण्याची गरज असते आणि हा शांतपणा त्यांना या निसर्गाची एक वेगळी अनुभूती दाखवून देत असतो.’ सौ. काकूंचे हे शब्द एका आध्यात्मिक क्षेत्रातील विद्वानांच्यापेक्षा कितीतरी वेगळे वाटतात.

यातून त्यांना निसर्गाच्या सान्निध्याची महती सांगायची होती आणि भूक भागवण्यासाठी जे उद्दिष्ट साध्य करायचे असते ते करणे किती गरजेचे असते, याचे भानही त्यांच्या मुखातून जपताना बाहेर पडले. यापेक्षा अध्यात्म काय वेगळे सांगते? श्रद्धा बळकट झाली, की तिचे रुपांतर भक्तीत होते. श्रद्धा साधकाला, भक्ताला, आपल्या आराध्याला अनुसंधानात ठेवते आणि परमात्मप्राप्तीस सहाय्यभूत होते, अशी सूचक कल्पना त्यांनी मांडली नसावी? कारण सौ. काकूंच्या जीवनाचा अध्यात्म, करुणा, भक्ती आणि श्रद्धा हा आधारभूत पाया होता. हे स्पष्टपणे त्यांच्या वरील उद्गारावरून दिसून आले. त्यांच्या सहवासात आठ-नऊ दिवस राहत असताना त्यांच्यातील अनेक गुणांचा, त्यांच्या स्वभावधर्माचा, त्यांच्या नेतृत्वाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या दातृत्वाचा जवळून परिचय अनुभवण्याचा योग आला आणि कदाचित या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळेच त्यांच्या अंत:करणातील कवयित्री जागी झाली असेल. त्यांच्या मनातील साहित्यिक कुठेतरी प्रज्वलित झाला असेल आणि शब्दाच्या सामर्थ्याचे बळ त्यांना अनेक ग्रंथसंपदा निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करीत असतील, असा मला विश्वास वाटतो.

त्यांचे पुत्र आणि एमआयटी संस्थेचे प्रमुख कार्यवाह श्री. राहुल ऊर्फ दादासाहेब कराड यांच्या अविरत कष्टाने आणि तीर्थरुप विश्वधर्मी डॉ. कराड यांच्या आशीर्वादाने जागतिक स्तरावर कार्य करण्याची संधी मिळाली आहे. राहुलदादांच्या कल्पनाशक्तीत किती आत्मविश्वास सामावलेला आहे, याचे प्रत्यक्ष प्रत्यंतर त्यांच्या कार्यावरून दिसून येत असले तरी या पाठीमागे त्यांची माता आणि पित्याचे आंतरिक आशीर्वाद आणि प्रोत्साहन तितकेच महत्त्वाचे वाटतात. सौ. पूनम, सौ. ज्योतीताई यांच्यावरही त्यांच्या संस्कारांचा विशेष प्रभाव पडल्याचे दिसते. त्यांच्या सहवासात अनेक वेळा त्या आपले मन मोकळे करून बोलायच्या. बोलताना त्यांच्या अंत:करणात आपल्या पतीच्या वैभवाबद्दलचा सार्थ अभिमान तर जाणवून येतच होता, पण कराड कुटुंबीयांच्या सर्वांबाबत त्यांच्या अंत:करणात जी एक प्रेमाची उभारी होती. तीही सातत्याने जाणवून येत होती. वृद्धापकालाकडे वय ओढून नेत असले तरी त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यात कुठेही परिवर्तन जाणवून येत नव्हते. कृतार्थ जीवनाची एक वेगळी अनुभूती सौ. ऊर्मिलाकाकूंंच्या जीवनाचा ध्यास बनलेली जाणवत होती.

१९६४ मध्ये बी. ए.ची पदवी प्राप्त केल्यानंतरसुद्धा ज्ञान प्राप्त करून घेण्याची त्यांची प्रेरणा विलक्षण वाटत होती. संतसाहित्याची प्रचंड आवड असताना समाजात सातत्याने होणाऱ्या परिवर्तनाची जाणीवही त्यांच्या मनावर लोळण घेत होती आणि यातूनच ‘समीर’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. गुणवंतांच्या सहवासात या व्यक्तिचित्राची एक अनोखी ठेवण एका ग्रंथाच्या निर्मितीने त्यांनी समाजासमोर ठेवली. ‘अरे संसार संसार,’ ‘अनुभूती,’ ‘माझी माय दुधावरची साय’ या कवितासंग्रहांचे बारकाईने वाचन केले, तर त्यांच्या करुणामयी विचारांची साक्ष प्रत्यक्षपणे दिसून येते. सर्व सुखाची लोळण समोर असताना अत्यंत साधेपणाने वागणे, आप्तेष्टांवर प्रेम करणे आणि कुटुंबातील सर्वांवर समान दृष्टीने प्रेमाची बरसात करणे हा काकूंंच्या जीवनवैशिष्ट्याचा स्थायीभाव होता. पंढरीची आषाढी यात्रा पायी करतानासुद्धा संसारिक वैभवाचे त्यांनी कधीच भान राखले नाही. त्याचे कारण होते, वारकऱ्यांबरोबर चालत असताना विठुनामाच्या गजराचा एक आविष्कार त्यांच्या अंत:करणाचा जणूकाही ठाव बनला होता. ऐश्वर्याने पदरात योग्य दान टाकूनसुद्धा शेकडो मैलांची पायी वारी करून त्या विठ्ठलाच्या चरणावर लोळण घेताना जो आनंद त्यांना मिळत होता तो आनंद त्यांच्या कृतार्थ जीवनाची जणूकाही अनुभूती होती.

घेईन मी जन्म याचसाठी देवा।
तुझी चरणसेवा साधावया॥
हरिनाम कीर्तन संतांचे पूजन।
घालू लोटांगण महाद्वारी॥
आनंदे निर्भर असो भलते ठायी।
सुख-दु:खे नाही चाड आम्हा॥
या जगद्गुरू तुकाराममहाराजांच्या अभंगाचे सार म्हणजे सौ. ऊर्मिलाकाकूंचा जीवनप्रवास आहे, असा आत्मविश्वास वाटतो. त्यांच्या ऐश्वर्यसंपन्न जीवनातसुद्धा एक खंत जाणवत होती, त्या जाणिवेचा कधी कधी चर्चेत त्या उल्लेख करीत, परंतु त्या खंतविषयी त्या फक्त पांडुरंगाची कृपा असे म्हणून त्यावर पांघरुण टाकत असत. तृप्तपणे आध्यात्मिक आणि सामाजिक जीवन जगणाऱ्या या महान अध्यात्मप्रिय व्यक्तिमत्त्वाला प्रवास पूर्ण केल्यानंतर चिरंतन थांबा भेटणार तो योग्य ठिकाणीच.

बाळासाहेब बडवे

Nilam: