रमेश जाधव |
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई – बांद्राचे अधीक्षक अभियंता अनिल पवार यांना सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने गौरवण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पवार यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात आले.
डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात अभियंता अनिल पवार यांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सोनिक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्याचे सचिव सदा साळुंखे, पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे सचिव खंडेराव पाटील, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी आणि अभियंता बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सन २०१५ साली सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक अंतर्गत असलेल्या धुळे सार्वजनिक बांधकाम मंडळात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असताना इंजि. अनिल पवार यांनी क्लीन रोड ड्राईव्ह ही संकल्पना यशस्वीपणे राबवली.
तत्कालीन मुख्य अभियंता इंजि. रवींद्र केडगे यांनी रस्त्यांची नियतकालिक दुरुस्तीची कामे ही सुनियोजित पद्धतीने गुणवत्ता राखून केल्याने पवार यांना चांगल्या कामाबाबतचे प्रशस्तिपत्रक बहाल केले. मुख्य अभियंता म्हणून कार्यरत राहिलेल्या इंजि. रवींद्र केडगे यांनी पथकर वसुली बंद करण्याकरीता औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे पथकर वसुली बंद करण्यात अभियंता अनिल पवार यांचा पुढाकार राहिला. त्याबाबतचे देखील त्यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले होते.
राज्यातील पहिले ई-टेंडर आणि ई -एमबी सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार येथे कार्यान्वित करण्यात अभियंता पवार यांचे मोलाचे योगदान राहिले. २०२१ साली कार्यकारी अभियंता पदावरून पवार यांना अधीक्षक अभियंता पदावर
पदोन्नती मिळाली.
सध्या मुंबई बांद्रा येथे सार्वजनिक बांधकाम मंडळाचे किनारी अधीक्षक अभियंता म्हणून ते कामकाज पहात आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला .