मुंबई : तुनिषा शर्मा आत्महत्या (Tunisha Sharma Suicide Case) प्रकरणातील मुख्य आरोपी शीजान खानला (Sheezan Khan) जामीन मिळाला आहे. त्याची आई आणि दोन बहिणी फलक नाझ आणि शफाक नाझ त्याला घेण्यासाठी वसई कोर्टात पोहोचल्या होत्या. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर शीजान त्यांना मिठी मारून रडताना दिसला. जवळपास 70 दिवस कारागृहात राहिल्यानंतर 4 मार्च रोजी शीजनला वसई न्यायालयातून (Vasai Court) जामीन मिळाला आहे. (Sheezan Khan Released on bail)
टीव्ही अभिनेत्री तुनिषाने 24 डिसेंबर रोजी शूटिंग सेटवर गळफास लावून आत्महत्या (Tunisha Sharma Suicide) केली होती. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर काही तासांनंतर तिच्या आईने तिचा सहकलाकार शीझान मोहम्मद खानविरुद्ध (Sheezan Mohammad Khan) तक्रार दाखल केली. 25 डिसेंबर 2022 रोजी पोलिसांनी शीजानला अटक केली होती.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वालीव पोलिसांनी 500 पानी आरोपपत्र दाखल केले होते. तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शीजानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक झाल्यापासून शीजनने अनेकवेळा जामिनासाठी अर्ज केला होता. 13 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत वसई न्यायालयाने शीजनचा जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर शीजनने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, मात्र 17 फेब्रुवारीला येथूनही शीजनला दिलासा मिळू शकला नाही.
शीजान आणि तुनिशा जवळपास 4 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. तुनिषाच्या आत्महत्येच्या १५ दिवस आधी दोघांचे ब्रेकअप झाले होते. अटकेनंतर झालेल्या चौकशीत शीजान खानने वय आणि धर्मामुळे तुनिशासोबत ब्रेकअप झाल्याचे मान्य केल्याची माहिती आहे.