तहसीलदारांकडून दुरुस्तीचे आदेश होत नाहीत
जिल्ह्यातील महसूल खात्याचा कारभार अत्यंत ढिसाळ प्रमाणात असल्याची बाबदेखील समोर आली आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून पाठपुरावा करूनही तहसीलदारांकडून चुक दुरुस्तीचे आदेश होत नाही, असा अनुभव नागरिकांना येत आहे. या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी शेतकर्यांना तहसील कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत.
रांजणी : हस्तलिखित सातबारा उतार्यावरील क्षेत्र आणि डिजिटल सातबारा उतार्यावरील क्षेत्र यातील तफावत, त्याचबरोबर सातबारा उतार्यावरील नावांमध्ये चुका अशा त्रुटी असलेल्या सातबारा उतार्यांच्या संख्येत घट होताना दिसत नसल्याचे एकंदरीत चित्र आहे. पुणे जिल्ह्यात अद्यापही सुमारे सात हजार पाचशे तेवीस सातबारा उतारा यामध्ये त्रुटी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे डिजिटल सातबारा उतार्यामधील तलाठ्यांच्या चुकांचा त्रास होणे सर्वसामान्य शेतकर्यांना सहन करावे लागत आहे. याआधी सातबारा उतार्यातील चुका दुरुस्तीचे अधिकार तलाठ्यांना होते, परंतु आता ते तहसीलदारांकडे आले आहेत.
सातबारा बिनचूक व्हावेत हे तपासण्याची जबाबदारी नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांच्यावर सोपवण्यात आली होती. तहसीलदारांना मात्र शेतकर्यांच्या सातबारा उतार्यात असलेल्या त्रुटी दुरुस्ती करण्यात स्वारस्य नसल्याचे दिसून येते. कारण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातबारा डिजिटल होऊनही त्यामध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने विशेषत: शेतकर्यांचे नुकसान होत आहे. शेतकरी तहसील कार्यालयात तहसीलदारांकडे सातबारा दुरुस्ती बाबत तक्रारी घेऊन गेल्यानंतर तहसील कार्यालयातील कर्मचार्यांकडून देखील शेतकर्यांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन मिळत नसल्याचे देखील दिसून आले आहे.
खरेतर महसूल खात्यात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू आहे.
मात्र महसूल खात्याच्या वरिष्ठांचे स्थानिक पातळीवर काम करणार्या कर्मचार्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून केला जात आहे. सातबारा संगणकीकरणात ९५ टक्के काम व्यवस्थित झाले आहे. चुका निदर्शनास आणून दिल्यास त्या दुरुस्त केल्या जात आहेत. शेतकर्यांना अडचण येणार नाही, असे पुणे जिल्हा तलाठी संघटनेचे अध्यक्ष सुधीर तेलंग यांनी सांगितले. दरम्यान सातबारा उतार्यामध्ये त्रुटी असलेल्या आणि विसंगत असलेल्या सातबारा उतार्यांमध्ये जुन्नर तालुक्यात २७, आंबेगाव ६०, शिरुर ४३१, खेड ३०२, पुरंदर ३३८, बारामती ३७३ , मावळ ६६८, इंदापूर ४३५ अशा सात बार्यांच्या त्रुटी आढळून आल्या असल्याची बाबदेखील समोर आली आहे.