तंबाखू सेवनाला आळा घालण्याची जबाबदारी सर्वांची

पुणे : तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे कोणत्याही स्वरूपातील सेवन ही कर्करोगासह अनेक घातक आजारांना आमंत्रण देणारी बाब असून, त्याला आळा घालणे ही सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे, असा सूर जिल्हा रुग्णालय आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेतील चर्चेप्रसंगी निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हास्तरीय तंबाखू समन्वय नियंत्रण कक्षाच्या जिल्हा नोडल अधिकारी डॉ. सुहासिनी घाणेकर, जिल्हा सल्लागार आणि मनोवैज्ञानिक हनुमान हाडे, महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेच्या राज्य प्रकल्प अधिकारी झिया शेख, विभागीय व्यवस्थापक अभिजित संघई आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम २००३ (कोट्पा अ‍ॅक्ट) मधील तरतुदींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी डॉ. घाणेकर म्हणाल्या, तंबाखू सेवन करणार्‍यांपैकी किमान ५० टक्के व्यक्तींचे मृत्यू तंबाखू सेवनामुळे होणार्‍या विविध आजारांमुळे होतात. हृदय बंद पडणे (आयएसडी किंवा हार्ट स्ट्रोक), विविध प्रकारचे कर्करोग, गंभीर श्वसनविकार अशा तीन मुख्य परिणामांसह अन्य आजारांनाही तंबाखू, सिगारेट कारणीभूत ठरते.

तंबाखू सेवनामुळे होणारे परिणाम अत्यंत दूरगामी असल्यामुळे कोट्पा अ‍ॅक्टची प्रभावी अंमलबजावणी करणे सर्व विभागांची जबाबदारी आहे. शालेय शिक्षण, आरोग्य विभाग, पोलीस, अन्न व औषध प्रशासन, उत्पादन शुल्क, वस्तू व सेवा कर विभाग, परिवहन विभाग आदी विभाग तसेच स्वयंसेवी संस्था यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे, असे सांगून डॉ. घाणेकर यांनी जिल्हास्तरीय तंबाखू समन्वय नियंत्रण कक्षाकडून करण्यात येणार्‍या कामाची माहिती दिली.

यावेळी श्रीमती झिया शेख यांनी कोट्पा अधिनियमातील कलम ४ व कलम ६अ आणि ६ब मधील तरतुदींची माहिती दिली. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी, १८ वर्षाखालील मुलांना तसेच शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी याबाबतच्या कायद्यातील तरतुदींची माहिती दिली. तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात, प्रदर्शित करणे, स्पॉन्सरशिप करणे या बाबींना असलेली बंदी, तंबाखूजन्य पदार्थांचे वेष्टन करणे व त्यावरील लेबलिंग याबाबतची नियमने, त्यावर छापायची धोक्याची चित्रे सूचना देण्यात आल्या आहेत.

Prakash Harale: