अहमदनगर : (Ex soldier appeal cm eknath shinde) जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सालवडगाव- पासून अगदी 2 किलोमीटर असलेल्या हनुमानवस्ती ही 350 लोकवस्ती असलेलं छोटेखानी गाव. मात्र गावत जाण्यासाठी आजही रस्ता नसल्याने गावातील माजी सैनिकाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( यांना पत्र पाठवून हेलिकॉप्टर खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्याची मागणी केली आहे. याआधी गावात जाण्यासाठी एका ओढ्यातून रस्ता होता, मात्र या ओढ्यावर बंधारे बांधण्यात आल्याने तोही रस्ता बंद झाला आहे.
शेवगाव तालुक्यातील सालवडगावपासून 2 किलोमीटर असलेल्या हनुमानवस्तीवर विखुरलेल्या या वस्तीत 350 लोक राहतात. मात्र, जुन्या ओढ्यातून रस्ता होता, मात्र त्यावरही बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे रस्त्याचं काम रखडलं. तत्कालीन तहसीलदार पागिरे यांनी रस्त्यांची पाहणी केली कामंही सुरू होणार होते मात्र, पावसामुळे काम रखडलं आणि ओढ्यावरही अतिक्रमण झालं. वर्षानुवर्षे रस्त्याची अशीच परिस्थिती असल्याने सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक दत्तू भापकर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून हेलिकॉप्टरसाठी अनुदान देण्याचीच मागणी केली आहे.
रस्त्याच्या या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय, पावसाळ्यात तर आठवड्यातून एकदा दोनदाच शाळेत जाता येतं. त्यामुळे एकीकडे समृद्धी महामार्गासारखा रस्ता होत असताना दुसरीकडे केवळ 2 किलोमीटरचा रस्ता होत नसेल तर ते दुर्दैव असल्याचं इथले विद्यार्थी सांगतात.