अनुभव दौऱ्याचा … अनुभव ऊर्जेचा…

संदीप विचारे या निर्मात्याने ‘विठू माऊली’चा गणेशोत्सवात औरंगाबाद येथे दौरा केला. यावेळी आलेल्या दौर्‍याबद्दल ते म्हणाले, ‘कोविडकाळानंतर झालेला हा पहिला विशेष दौरा होता. ‘विठू माऊली’ची कुठलीही जाहिरात नव्हती. नाटकात कोणी सेलिब्रेटी नसतानाही पूर्वपुण्याईवर ‘विठू माऊली’ नाटकाला मराठवाड्यात मानाचे तीन प्रयोग मिळाले. पंचेचाळीस जणांची टीम. दमछाक होईल अशी धावपळ. नियोजनात कुठलीही चूक झाली तरी सगळं मुसळ केरात. कन्नडचा प्रयोग माईक सिस्टीममुळे अपेक्षेइतका चांगला झाला नाही. सिल्लोडच्या आयोजकांना रातोरात ही बातमी कळली. आम्ही सिल्लोडला पोहोचलो. साध्या व्यक्तिमत्वाचे चाळीसजण आणि आमचा अवतार पाहून आयोजक गडबडले. पोहोचल्यापासून ते एकाच चिंतेत… हे काय प्रयोग करणार? काल लावणीच्या शृंगाररसात न्हाऊन निघालेले प्रेक्षक आज भक्क्तीरसात कसे न्हाऊन निघणार, या चिंतेत आयोजक दिसले. दुपारची जेवणं झाली. आमच्या टीमने कंबर कसली.

सातच्या प्रयोगाची तयारी करण्यासाठी टीमला चार वाजताच प्रयोगाच्या ठिकाणी नेलं. सर्वांना विश्‍वासात घेतलं, समुपदेशन केलं. कारण कालच्या प्रयोगाच्या अनुभवावरून ते करणं गरजेचं होतं. प्रयोगासाठी संगीत संयोजक निलेश याच्या साहाय्याने मुद्दाम एक भारूड बसवलं. टीमला सगळ्या सूचना दिल्या. ज्या आनंदात माऊलीची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते, तसे आम्ही आमच्या नाट्यरुपी विठ्ठलाला भेटण्यास सज्ज झालो. आठला प्रयोग सुरु झाला. समोरील पटांगणात दीड-दोन हजारांचा जनसमुदाय. अशा समुदयात फक्त वाद्यवृंद होतात. आमचं नाटक भक्तीरसाने ओथंबलेलं. कीर्तनाचा गजर झाला. समोरील प्रेक्षक अडीच तासाच्या विठूच्या हरिनामात तल्लीन झाले. भक्तीरसात न्हाऊन निघाले. सिल्लोडमध्ये जणू काही पंढरपूर अवतरलं. साक्षात ‘लावणी भुलली अभंगाला’चा अनुभव. शेवटच्या दिंडीत प्रेक्षक उस्फूर्तपणे सामील झाले. विठ्ठलाची पूजा दर्शन घेण्यासाठी बाया बापड्यानी रंगमंचावर रांगा लावल्या. श्री. विचारे यांनी हा स्वत: घेतलेला अनुभव कोरोनाकाळानंतर बदललेली परिस्थिती वर्णन करतो.

परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागल्याचं हे द्योतक. मन्वंतराचा हा टप्पा समाधान देणारा आहे. अशोक सराफ यांचं ‘व्हॅक्युम क्लिनर’ हे नाटकही सध्या चांगलं चाललंय. या नाट्यकृतीने प्रेक्षकांची नव्याने पसंती मिळवली आहे. या नाटकात अशोकजी ज्या ऊर्जेने भूमिका साकारतात ते पाहून ‘हॅट्स ऑफ’ करावंसं वाटतं. अलिकडेच त्यांनी पंच्याहत्तरीत पदार्पण केलं. त्यांना रंगमंचावर वावरताना पाहिलं की मनात विचार येतो, या माणसाच्या ठायी एवढी ऊर्जा कुठून येते? पंच्याहत्तरीच्या सोहळ्याप्रसंगी उत्तर देताना ते अलिकडे भावूक झाले आणि म्हणाले, आज मी नि:शब्द झालोय. असा सत्कार, प्रेम फार कमी लोकांच्या वाट्याला येतं. तुम्हा प्रेक्षकांमुळे मी इथपर्यंत पोहोचलो. असंच प्रेम कायम ठेवा. अशोकजींना लवकर पद्मश्री मिळायला हवी, असं नाट्य-चित्रपटसृष्टीतल्या अनेकांना वाटतंय.

नाट्य व्यवस्थापकांना मदत द्यायची तर…
नाट्यसृष्टीतला प्रत्येक घटक हा महत्त्वाचा आहे. सर्वांचीच दखल ही घेतली जाते का, हा प्रश्‍न सतावत असताना शिवाजी मंदिर नाट्यगृहात ८० टक्के नाटकांचं बुकिंग करणारे हरी पाटणकर भेटले. बिनधास्त बोलणारी ही व्यक्ती. विषय स्पष्ट करताच ते बोलू लागले, लॉकडाऊनच्या काळात आमच्याकडे कोणीही पाहिलं नाही. नाटकं होत नव्हती. नाट्यगृहं दोन वर्षांपासून बंद होती. आम्ही जगलो कसं ते आम्हालाच ठाऊक. हरी पाटणकर हे व्यवस्थापक संघाचे पदाधिकारी आहेत. त्यांना नाट्य परिषदेकडून नक्कीच मदत मिळाली असणार असा अंदाज होता. कारण गेल्या लॉकडाऊनच्या वेळी नाट्य परिषदेने अशा गरजूंना मदत दिल्याचं ऐकिवात होतं. ते म्हणाले, नाट्य परिषद फक्त रंगमंच कामगारांचा विचार करते. निर्माता संघसुद्धा काहीही विचार करत नाहीत. त्यामुळे बुकिंग क्लार्क, व्यवस्थापक यांना कुणीही वाली नाही. निर्माते नाटकांची निर्मिती करतात. पण नाटक चालवण्यासाठी महत्वाची भूमिका व्यवस्थापक निभावत असतो. नाटकाला जास्तीत जास्त प्रेक्षक कसे येतील हे बुकिंग क्लार्क पहात असतो. प्रेक्षक बुकिंग क्लार्कला नाटक कसं आहे ते विचारतात.

तो नाटकाची प्रशंसा करतो. प्रेक्षक तिकिट काढतात. नाटक चांगलं असेल ते शुभेच्छा देऊन जातात आणि वाईट असेल तर त्यांचे पैसे वाया गेले म्हणून बोलणी खावी लागतात. आता निर्मात्या संघात दोन गट पडले आहेत. अशा वेळी वेदना कोणाला सांगायच्या? आम्ही गप्प आहोत. आमच्या मंडळींना मदत कशी होईल ते फक्त पहात असतो. सोलापूरचे व्यवस्थापक गुरु वठारे आपली कैफियत मांडताना म्हणाले, मी गेली २५ वर्षं नाट्य व्यवसायाशी निगडित आहे. हा व्यवसाय करताना कोरोनासारखं संकट यापूर्वी पाहिलं नव्हतं. निर्मात्यांना शासन अनुदान देतं, निर्माता संघ आणि रंगमंच कामगार संघटना त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहते. त्यांना जशी आर्थिक मदत केली जाते तशी मदत निर्माता संघाने मुंबईबाहेरील नाट्य व्यवस्थापकांनादेखील द्यावी. नाट्य परिषदेने मुंबईबाहेरील कोणत्याही नाट्य व्यवस्थापकांचा विचार केलेला नाही. रंगमंच कामगारांसोबत रंगमंच कामगार संघटनेने व्यवस्थापकांनाही समाविष्ट करून घेणं गरजेचं आहे. आमच्यासारख्या व्यवस्थापकांना शासनाकडून कशी मदत मिळेल, याचाही विचार नाट्य परिषदेने करावा. अन्यथा, अडचणीच्या परिस्थितीत नाट्य व्यवसाय करण्यास मुंबईबाहेरील कोणीही व्यक्ती तयार होणार नाही आणि मराठी नाटक मुंबई-पुण्याबाहेर पोहोचणार नाही.

जाहिरात एजन्सीजही अडचणीत-

नाटकवाल्यांना वर्तमानपत्रातून जाहिरात द्यावी लागते. त्यामुळे नाट्य व्यवसायात जाहिरात एजन्सी हा महत्वाचा घटक मानला जातो. त्यांच्याशिवाय नाट्य निर्मात्यांचं पान हलतं नाही. नाटक व्यावसायिक असो वा प्रायोगिक, जाहिरात द्यावीच लागते. नुसतं नाटकच नाही तर वाद्यवृंद, सांस्कृतिक कार्यक्रम वा एखादी इव्हेंट असो, जाहिरात महत्वाची असते. मुंबई, पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रात अनेक जाहिरात एजन्सीज आहेत. त्या सर्व जबाबदार्‍या एका ध्येयाने पार पाडत आल्याचं अनेक वर्षं दिसलं. दोन वर्षांच्या कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय हा ठप्प झाला होता.

Nilam: