“…त्यामुळे मैदानही तेच राहणार”, दसरा मेळाव्यावर अंबादास दानवेंनी सांगितलं स्पष्टच!

मुंबई | Explanation Of Ambadas Danve On Dasara Melava – यंदाचा दसरा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसंच मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेनं अर्ज दाखल केला आहे. मात्र, अद्याप शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळालेली नाही. तसंच आम्हीच खरी शिवसेना असून शिवतीर्थावर आम्हीच दसरा मेळावा घेणार, असा दावा ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून केला जात आहे. याच दरम्यान शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी दसरा मेळाव्यावरून स्पष्टीकरण देत शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, “शिवसेनेनं कधीही झेंडा किंवा नेता बदलला नाही. शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्याचं हे 56 वे वर्ष असेल. शिवसेना पक्षाची जेव्हा स्थापना झाली, तेव्हापासून शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित केला जात आहे. ‘एक झेंडा, एक नेता आणि एक मैदान’ हे शिवसेनेचं नेहमीच एक वाक्य राहिलं आहे”.

“कित्येक लोकांनी झेंडे बदलले, कित्येक लोकांनी नेते बदलले. पण 1967 पासून शिवसेनेचा तोच ध्वज कायम आहे. नेतेही तेच आहेत त्यामुळे मैदानही तेच राहणार आहे. म्हणून शिवसैनिकांच्या किंवा महाराष्ट्राच्या मनात शंका येण्याचं काहीही कारण नाही. शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा काही एका राजकीय पक्षाचा मेळावा नाही, तो महाराष्ट्राच्या विचाराचा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मेळावा आहे. यादिवशी विचारांचं सोनं लुटलं जातं, त्यामुळे याबाबत संभ्रम आणि संशय असण्याचं काहीही कारण नाही” असं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

Sumitra nalawade: