मुंबई | Chhagan Bhujbal – राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. “सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?” असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. दरम्यान आता या वक्तव्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“माझ्या वक्तव्याचं राजकारण केलं जात आहे. समता परिषदेच्या कार्यक्रमात मी केवळ माझं मत मांडलं होतं. प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. ज्योतीबा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पूर्ण होणार असल्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम होता. यावेळी बोलताना, आपण शाळेत पहिल्या दिवशी सरस्वतीची पूजा करतो. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतीबा फुले, अण्णासाहेब कर्वे आदी महापूरूषांची पूजा करत नाही. ते आपले देव आहेत. त्यांची पूजा आपण का करत नाही. या लोकांनी आपल्यासाठी शिक्षणाची दारे उघडी केली. यावेळी त्यांना विरोध सहन करावा लागला. अशा परिस्थीतीत ज्यांनी आपल्याला शिक्षणाची दारे उघडी केली त्यांची पूजा करायची सोडून आपण सरस्वती देवीची पूजा करतो. त्यामुळे देवीच्या जागी महापुरूषांची पूजा करावी एवढं माझ्या म्हणण्याचा उद्देश होता”, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
“कोणाचे फोटो काढा किंवा लावा, असं मी म्हणालो नव्हतो. मात्र, माझ्या वक्तव्याचा राजकीय मुद्दा मनवला जातो आहे. मी सुद्धा हिंदू आहे. नाशिकमध्ये अनेक मंदिरांची कामे मी केली आहेत. कुंभमेळाव्यासाठीही आम्ही भरपूर कामे केली आहेत. माझ्या घरातही देवदेवतांची पूजा होते. आम्ही सर्वच देवीच्या दर्शनाला जातो. तुम्ही कुटुंबात कोणत्या देवाची पूजा करता हा ज्याचा त्याचा विषय आहे. मात्र, शाळेत महापुरूषांचे फोटो बाजूला सारून देवीची पूजा करणं योग्य नाही, एवढच माझं म्हणणं होतं”, असंही छगन भुजबळ म्हणाले.