खडकवासला : सिंहगडाच्या पायथ्याशी आतकरवाडी घेरामधील एका ज्येष्ठ नागरिकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रविवारी स्थानिक नागरिकांना स्मशानभूमी नसल्याने रस्त्यावर वाहणारे पावसाचे पाणी ओसरण्यासाठी तब्बल तीन तास प्रेत घेऊन ताटकळत थांबावे लागले. पाऊस विश्रांती घेत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी भर पावसातच तात्पुरता पत्र्याचा आसरा उभारून स्थानिकांनी आदिवासी ज्येष्ठ नागरिकावर अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडले. या घटनेने राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा पर्दाफाश झाला. मृत्यूनंतरही वेदना संपत नसल्याचा प्रत्यय या घटनेमुळे आला.
ऐतिहासिक किल्ले सिंहगडाचे पायथ्याशी आतकरवाडीमध्ये आज रविवारी डोकं सुन्न करणारं हे भयावह चित्र पाहायला मिळाले. आतकरवाडी येथील एक ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत पढेर (वय ६५) यांचे निधन झाले होते. संबंधित नागरिकाचे अंत्यसंस्कार गावात हक्काची स्मशानभूमी नसल्याने रस्त्यातच करावे लागणार होते. मात्र सिंहगड खोऱ्यात जोरदार पावसामुळे स्मशानभूमीच्या ठिकाणी पाणी वाहत असल्याने ग्रामस्थ पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. तब्बल तीन तास अंत्यविधी लांबला मात्र पाऊस काही थांबत नव्हता. त्यामुळे अखेर ग्रामस्थांनी भर पावसातच चितेवर आसरा म्हणून लाकडी खांब उभे करून त्यावर पत्रे टाकुन अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मुसळधार पावसातच मृत व्यक्तीवर अंत्यविधी होत होता.
घेरा सिंहगडमधील रहिवाशांची परवड थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वनविभागाशी चर्चा करून घेरा सिंहगडमधील सर्व गावांत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. येथील चारही महसुली गावांसाठी गावठाण जाहीर करण्याचे प्रस्ताव मागीस आठ वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडे धूळ खात पडून आहेत.
– दत्ता जोरकर, माजी सदस्य पंचायत समिती हवेली
घेरा सिंहगड ग्रामपंचायत वारंवार स्मशानभूमीसाठी जागेची मागणी करत आहे. येथील आतकरवाडी, सांबरेवाडी, थोपटेवाडी, दुर्गदरा, भडाळेवाडी व इतर गावात वर्षांतून पाच-सात वेळा अशीच दुर्दैवी परिस्थिती निर्माण होते. सरकारने तातडीने आमचे जागेची अडचण दूर करावी.
– कु. मोनिका पढेर, (सरपंच, घेरा सिंहगड)
शहराच्या अगदी जवळ असलेल्या गावातले हे वास्तव चित्र राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढणारेच होते. घेरा सिंहगडमध्ये आठ ते दहा लहान मोठी गावे असून बहुतांश गावात अद्यापही स्मशानभूमीची सोय नाही. येथील ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी हक्काची जागाच नसल्याने येथे राज्य सरकार व जिल्हा परिषदेमार्फत स्मशानभूमी उभारल्या गेल्या नाहीत. त्यामुळे येथे अनेक ठिकाणी रस्त्यातच अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडले जातात हे गंभीर आहे.
संबंधित ग्रामपंचायतीने गावठाण जाहीर करण्याच्या मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी व राज्य सरकारकडे पाठवून आठ ते दहा वर्षे झाली आहेत. मात्र अद्यापही गावठाण जाहीर नसल्याने या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला अशा सुविधा देताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून राज्यात घेरा सिंहगड ग्रामपंचायत ओळखली जाते. या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये चार महसुली गावे व इतर आठ-दहा वाड्या असून बहुतांश गावात हीच परिस्थिती आहे.
ग्रुप ग्रामपंचायत घेरा सिंहगडला चार महसुली गावे असून देखील गावठाणच नाही.गावठाण मागणीचे प्रस्ताव राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडे सात वर्षापासून धूळ खात पडलेे आहेत. स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यकच आहे.