“फ. मुं. शिंदे समाजातील अस्वस्थता मांडणारा कवी”: ज्येष्ठ नेते शरद पवार

पुणे : ‘उत्तुंग प्रतिभा लाभलेले आणि तरीही जमिनीवर पाय असलेले, तुमच्या आमच्यात मिसळणारे फ. मुं. संवेदनशील साहित्यिक असून, समाजातील सभोवतालचे वातावरण पाहून त्यातील अस्वस्थता टिपणारा साहित्यिक आहे,’ असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.

फ. मुं. शिंदे मित्रमंडळ आणि परिवारातर्फे ज्येष्ठ कवी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांचा अमृतमहोत्सवानिमित्त ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लीला फकीरा शिंदे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्यध्यक्ष, लेखक प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ कवी आणि समीक्षक प्रा. विश्वास वसेकर, संवाद, पुणेचे सुनील महाजन, ऋचा शिंदे, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

फ. मुं. शिंदे यांचे साहित्यातील योगदान मोठे असून माणसे जोडण्याची, त्यांच्याशी सुसंवाद ठेवण्याची आणि संपर्क प्रस्थापित करण्याची अनोखी कला त्यांच्याकडे आहे. फ. मुं. हे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाशी नाळ जोडलेले साहित्यिक आहेत.

शरद पवार, अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

यावेळी बोलताना फ. मुं. शिंदे म्हणाले की, ‘एक साहित्यिक राजकारणाकडे पाहण्याची आमची वेगळी दृष्टी आहे. उपरोधिक टिप्पण्या करून आम्ही समाजाची स्पंदने मांडत असतो. यावेळी त्यांनी आई ही त्यांची प्रसिद्ध कवितादेखील सादर केली.
यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, फ. मुं. शिंदे म्हणजे जातीपातीच्या पलीकडे जाऊन एक ठोस भूमिका घेऊन साहित्यविश्वात आणि समाजात वावरणारा साहित्यिक आहे. फ. मुं. यांची शरीरयष्टी आणि दिसण्यावरून ते दलित समाजातील असावेत, असा माझा समज होता. परंतु, ते मराठा समाजाचे आहेत. असे असूनही मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्यात फ. मुं. हे अग्रस्थानी होते. यावेळी रामदास फुटाणे, प्रा. मिलिंद जोशी आणि प्रा. विश्वास वसेकर यांनी मनोेगत व्यक्त केले. सचिन ईटकर यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील महाजन यांनी आभार मानले.

Dnyaneshwar: