मुंबई | Devendra Fadnavis – सध्या संपूर्ण राज्याचं शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) दसरा मेळाव्याकडे (Dasara Melava) लक्ष लागलं आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काय बोलणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. याच दरम्यान दसरा मेळाव्यातील भाषणांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना आणि शिंदे गटाला इशारा दिला आहे. “भाषणं करताना कायदा मोडला तर कायदा आपलं काम करेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच नेत्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून भाषणं करावीत, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
“राजकारणात एकमेकांवर टीका केली जाते. विचार मांडले जातात. हे विचार कायद्याच्या चौकटीत राहून खुसखुशीत पद्धतीने, व्यंगातून किंवा अतिशयोक्तीतूनही मांडले जावेत. दोन्ही मेळावे शांततेत पार पडावेत, यासाठी बंदोबस्त करण्यात आला आहे. यादरम्यान कायदा सुव्यवस्था नीट राखली जाईल”, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काही जणांकडून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या घटकांनी गर्दीचा फायदा घेऊ नये, याकडे गृह विभागाचं विशेष लक्ष असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याची कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.