मुंबईच्या झवेरी बाजारात बनावट धाड, बोगस ईडी अधिकाऱ्यांनी व्यावसायिकाला लुटले

मुंबई | Mumbai Crime – मुंबईच्या झवेरी बाजारात (Zaveri Bazar) बोगस ई़डी अधिकाऱ्यांनी (Fake ED Officers) एका व्यावसायिकाला लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका टोळीनं ईडी अधिकारी असल्याचं भासवून झवेरी बाजारातील एका व्यावसायिकाला कोट्यवधीचा गंडा घातला आहे. या टोळीनं ईडी अधिकारी असल्याचं सांगत दुकानातली 25 लाखांची रोकड जप्त केली. तसंच तीन किलो सोनंही जप्त केलं. त्यानंतर दुकान लुटून आरोपी भरदिवसा पसार झाले आहेत. त्यामुळे झवेरी बाजारमध्ये (Zaveri Bazar) एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा शोध सुरु केला आहे. विविध ठिकाणी पोलिसांचं पथक आरोपींचा शोध घेत आहेत. तसंच पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम 394, 506(2) आणि 120 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या एल टी मार्ग पोलिसांनी यातील दोन आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (23 जानेवारी) हे चोरटे बनावट ईडी अधिकारी असल्याचं सांगून एका व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसले. त्यावेळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन आधी काढून घेतले. तसंच एका कर्मचाऱ्याला यावेळी हातकडी देखील घातल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, ‘स्पेशल 26’ या चित्रपटात जशी खोटे अधिकारी बनून लूटमार करण्यात आली होती अगदी तशीच झवेरी बाजारात (Zaveri Bazar) ही घटना घडली आहे. त्यामुळे आता संपूर्ण मुंबईभर या घटनेची चर्चा सुरु आहे. या चोरट्यांनी फिल्मी स्टाईलनं तब्बल 25 लाखांची रोख रक्कम आणि 1 कोटी 70 लाख रुपयांचे दागिने लंपास केल्यानं पोलीस प्रशासन देखील हादरलं आहे.

Sumitra nalawade: