सण आणि त्यांचे बदलते स्वरूप…

-अ‍ॅड. महेश भोसले

आपण उत्सवप्रिय समाज आहोत. आपल्याला नेहमी काही ना काही सण – उत्सव हवेच असतात. सध्या आपल्याकडे दहा दिवसांचा गणेशोत्सव चालू आहे. त्यानंतर लगेच पितरपक्ष, नंतर नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी. श्रावण महिना ते दिवाळी आपल्याकडे सणांची रेलचेल असते. हे सण पारंपरिक असले तरीही कालानुरूप त्यामध्ये बदल होत गेले. सणांचे स्वरूप आणि दिखावा बदलला. त्याला एक मोठे रूप प्राप्त झाले. त्या मोठ्या रूपाचे रुपांतर अर्थकारण ते राजकारण इतक्या मोठ्या वळणावर येऊन ठेपले आहे. एकदा एखाद्या गोष्टीत अर्थकारण आणि राजकारण आले की त्यासाठी उपयुक्त असणाऱ्या सर्व नैतिक-अनैतिक बाबी आपल्याला आहेत, तशाच स्वीकारून चालावे लागते. किंवा त्याभोवती व्यवस्थाच अशी बनते, की आपणास तसे बनण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. सण म्हटले, की धर्म आला, धर्म म्हटले, की धार्मिक भावना आल्या, श्रद्धा आली आणि त्यासोबतच अंधश्रद्धादेखील आली. तसेच धार्मिक भावना म्हटले, की त्या जपण्याची अतिरिक्त जबाबदारी आली आणि त्या दुखावल्या गेल्यास होणाऱ्या दुष्परिणामाचे दैनंदिन जीवनावर होणारे चांगले – वाईट परिणामदेखील आलेच.

श्रावण सुरू झाला की, आपल्याकडे येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. या सणाचे वैशिष्ट्य काय होते, तर सासुरवाशिणी मुलीने माहेरी यायचे आणि नागाची पूजा करायची. गावाकडे महिला नागाच्या वारुळाची पूजा करीत. काही महिला नागाचे चित्र भिंतीवर लावून त्याची पूजा करत असत. त्यानंतर महिला झाडाला वगैरे झोका बांधत. तसेच काही भागात मुले पतंग उडवतात. घरी पुरणपोळीचे जेवण केले जाई. अशा अगदी सध्या प्रकारे हा सण साजरा केला जात असे. मध्यंतरी अचानकच कुठून तरी अफवा आली की, कुणाला तरी नागदेवता प्रसन्न झाली आणि त्याने सांगितले की, प्रत्येकीने आपल्या भावजयीला हिरवा चुडा भरायचा. कुठलीही खात्री न करता आपण लगेच हिरव्या रंगाच्या बांगड्या घेऊन त्या आपल्या भावजयीला भरण्यास सुरुवात केली.

गणेशोत्सवातदेखील खूप बदल झालेले आहेत. असे म्हणतात, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. काही लोक गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केला म्हणतात. तो कुणीही सुरू केला असला तरीही त्यामागे हेतू काय होता, हे पाहणे मला महत्त्वाचे वाटते.गणेशोत्सवाच्या नावाखाली लोक एकत्र येतील आणि त्यामुळे लोकांमध्ये संवाद निर्माण होईल. लोक एकत्र आले तर त्याचा उपयोग चांगल्या व्यवस्थेसाठी होईल, असा एक विचार गणेश उत्सवामागे होता, हे आपल्याला शिकवण्यात आले आहे. ते योग्यदेखील आहे. पण या सगळ्यात अचानकच “मानाचा गणपती” नावाची एक संकल्पना आली. कुठलाही गणपती जास्त मानाचा आणि कुठलातरी गणपती कमी मानाचा असा भेदभाव आपण देवामध्ये कसा आणू शकतो, हा एक अनुत्तरित प्रश्न आहे.

गणपतीच्या मूर्ती खरेदीमध्येदेखील आपण काहीतरी अंधश्रद्धा आली. एखादी उजव्या सोंडेची मूर्ती असली की ती शुभ आणि डाव्या सोंडेची असली तर अशुभ अशा अंधश्रद्धादेखील आल्या. मग त्यामध्ये मोठाले सेलिब्रेटी आले, त्यांचेसोबत राजकीय पुढारी आले आणि त्यांच्यासोबत आले मताचे राजकारण. आता गणपतीदेखील वेगवेगळ्या वेशात आले. अगदी पोलिसांचा ड्रेस घातलेला गणपतीपासून थेट पंतप्रधानांचा लूक असलेला गणपतीदेखील आला. मग गणेश मंडळ आणि त्यांचे गणपतीसमोर असलेले देखावेदेखील निर्माण झाले. या देखाव्याद्वारे वेगवेगळे विचार मांडले जाऊ लागले आणि ज्यांना विचार नाही पटला त्यांच्या पुन्हा भावनेचा प्रश्न निर्माण झाला. हे सगळे आपल्या मूळ सणात होते का ? हे आपण शोधले पाहिजे. बऱ्याच गणेश मंडळांपुढे रात्रभर पत्ते खेळले जातात आणि त्याच्या माध्यमातून पैसा उभा केला जातो. बऱ्याच गणपतींच्या दर्शनासाठी पास काढलेले आहेत.

ज्यासाठी पैसेदेखील मोजावे लागतात. अशा माध्यमातून पैसा उभा केला जातो. लोक गणपतीला नवस बोलतात आणि करोडो रुपये दान करतात. अशा नवस-सायास करण्याच्या अंधश्रद्धा आपल्या मूळ उत्सवात नव्हत्या. मोठमोठाल्या आवाजातील डी. जे.मुळे होणारे त्रास, रस्त्यावर दिलेले मंडप आणि त्यामुळे सामान्य माणसाला होणारे अडथळे, मिरवणुकीत कोणता गणपती आधी जाणार, म्हणून होणारे मानापमाननाट्य हे आपल्या सणाचे मूळ स्वरूप आणि त्यामागचा हेतू याला बाधा आणणारे आहे. ढोल पथकांचा अगदी शहरांच्या मध्यवर्ती भागात होणारा कर्णकर्कश आवाज आणि त्यामुळे होणारे त्रास याकडे कुणीही लक्ष देत नाही. मोठमोठाले गणेश मंडळ आणि त्यामध्ये त्यांचे आलेले अर्थकारण यामध्ये गणेशाची भक्ती आणि भक्त कुठे आहेत, हे आपण शोधले पाहिजे.

जे गणेश महोत्सवाचे झाले आहे तेच नवरात्र महोत्सवाचेदेखील झालेले आहे. घट बसल्यापासून ते दसरा येईपर्यंत सर्वच बदलले आहे. हल्ली नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करीत रेल्वेच्या डब्यासारखे उभा राहत महिलांनी फोटो काढण्याची नवीनच पद्धत सुरू झाली आहे. आजचा रंग अमुक अमुक असे जाहीर करून सर्व महिलांनी त्या दिवशी त्याच रंगाची साडी घालायची. ही कुठली नवीनच पद्धती आपण नवरात्र महोत्सवात आणली आहे, हे मात्र अनाकलनीय आहे. सणांची ही बदलती पद्धत नेमकी आली कशी? ही नैसर्गिक तर नाही. ही बदलणारी पद्धत दुसरे-तिसरे काहीही नसून तो एक व्यापार आहे.

यामध्ये होणारी उलाढाल आणि मिळणारा नफा हा कित्येक करोडो रुपयांचा आहे. गणेशोत्सवात पत्ते खेळून गोळा केली जाणारी के. टी.पासून ते नागपंचमीमध्ये भावजयीला भरायच्या बांगड्या आणि नवरात्रीतील आजची ठराविक रंगाची साडी हा सगळा आर्थिक व्यापार आहे, तर जनतेची महत्त्वाची कामे सोडून मुख्यमंत्र्यांनी केवळ गणेश मंडळांना भेटी देत फिरणे आणि गर्दी जमा करून त्यातून मतदार उभा करणे हा झाला राजकीय व्यापार. हे दोन्हीही व्यापार आहेत, पण त्याला कवच आहे भक्तांची श्रद्धा आणि धार्मिक भावना याचे. यामध्ये आपण केवळ एक खेळणे बनत चाललेलो आहोत. आपण यावर बोललो की, त्याचे रुपांतर धार्मिक भावनेत केले जाण्याची शक्यता जास्त असून त्यामुळे पुन्हा अशांतता प्रस्थापित होऊ शकते. या सर्वांवर आपण बोलले पाहिजे. आपला विरोध गणेशोत्सव किंवा कुठल्याही सणाला नाही, तो असूच शकत नाही. पण त्याआडून होत असलेला व्यापार मात्र लोकांच्या गळी पडणे चूक आहे.


Sumitra nalawade: