“आव्हानात्मक काळात नवीन मार्ग दाखवा”; इस्त्रोचे प्रमुख डॉ. सोमनाथ एस यांचे आवाहन

राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
पुणे : भारताने संशोधन आणि तंत्रज्ञान निर्मिती या क्षेत्रात जागतिक ओळख मिळवली आहे, त्यात चमक वाढवण्याची जबाबदारी पदवी प्रदान झालेल्या विद्यार्थ्यांवर आहे. या आव्हानात्मक काळात देशाला तुमची पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे. विद्यार्थ्यांना ध्येयांप्रती समर्पित राहण्याचे बळ येथून मिळाले. कोणतीही पदवी, मान्यता, प्रमाणपत्र किंवा पुरस्कार सहजासहजी मिळत नाही, तर सातत्यपूर्ण प्रयत्न आणि वचनबद्धतेने ती मिळवता येते. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यातील यश वैयक्तिक आणि व्यावसायिक यासारख्या अनेक गुणांवर अवलंबून असते. विद्यार्थ्य्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करून देशाला नवीन मार्ग दाखवावा आणि देशाला जगात महासत्ता बनवावे, असे मत इस्त्रोच प्रमुख डॉ. सोमनाथ एस यांनी व्यक्त केले.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणेच्या पाचव्या पदवीदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी भारतीय केमिकल सोसायटीचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, सामा टेक्नॉलॉजीज यूएसएचे सीईओ आणि संस्थापक सुरेश कट्टा, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा.ज्योती ढाकणे, डॉ.पी.बी. जोशी, डॉ. सुनीता कराड, प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. महेश चोपडे, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. ज्ञानदेव निलवर्ण यांच्यासह अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
दरम्यान, विद्यापीठाने सामा टेक्नॉलॉजीज यूएसएचे सीईओ आणि संस्थापक श्री सुरेश कट्टा यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. तसेच पहिला भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार डॉ. गणपती यादव यांना प्रदान करण्यात आला.

डॉ. सोमनाथ एस म्हणाले की मला विश्वास आहे की तुमची प्रतिभा, कल्पना, उर्जा आणि उत्साहाने तुम्ही यशस्वी आणि परिपूर्ण करिअर बनवाल आणि देशाच्या अपेक्षा पूर्ण कराल. भविष्यातील भारत घडवण्यासाठी तुमचा सहभाग आवश्यक आहे.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, मानवता कल्याणासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा. एमआयटी एडीटी विद्यापीठात मिळणाऱ्या सर्वांगिण विकासात्मक शिक्षणाचा आपले भविष्य घडविण्यासाठी करावे. पदवीधरांना केवळ परंपरेचे पालन न करता सर्जनशीलतेने विचार करण्याचा आणि नवीन शोध घेण्याचा सल्ला दिला. सर्व पदवीधरांचे यश आणि आगामी यशाबद्दल अभिनंदन केले ज्यामध्ये ते प्रवेश करणार आहेत. विद्यापीठातील मूल्यात्मक शिक्षण प्रणाली तुम्हाला उच्च आणि उदात्त आकांक्षांसाठी प्रेरणा देईल. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.मंगेश कराड म्हणाले, विद्यापीठाचा हा पाचवा दीक्षांत समारंभ आहे.

विद्यापीठातर्फे २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात १६ विविध विद्याशाखेतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्रासाठी पात्र असलेल्या २३१५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. यात ४५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. यात एमआयटी स्कूल ऑफ डिझाइनचे ३९२, एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे २२६, महाराष्ट्र अकॉडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन ॲन्डट्रेनी (एमआयटी मॅनेट) चे २२९, एमआयटी स्कूल ऑफ अर्किटेक्चर २९, एमआयटी स्कूल ऑफ फाईनआर्ट १०५, एमआयटी स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च ४५, एमआयटी आयएसबीजे १३८, एमआयटी स्कूलऑफ वैदिक सायन्स ५३, एमआयटी फुड आणि टेक्नॉलॉजी १४६, एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंग ७६०, एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजीनिअरिंग सायन्स अँड रिसर्च८४ आणि एमआयटी संगीत कला अकादमीचे २१, एमआयटी स्कूल ऑफ ड्रामा ५, एमआयटी एसएफटी २३, एमआयटी फ्यूज 27, एमआयटी एसओएच18 आणि पीएचडीचे १४ अशा एकूण २३१५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. पाहुण्यांनी पदक विजेत्यांचे आणि इतर उत्तीर्णांचे अभिनंदन केले. प्रा. स्नेहा वाघटकर, डॉ. अशोक घुगे, प्रा. स्वप्निल शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रामचंद्र पुजेरी यांनी आभार मानले.

Dnyaneshwar: