अखेर प्रशांत किशोर यांनी चर्चांना दिला पूर्णविराम; म्हणाले,

पटना : मागिल अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आपण कोणताही पक्ष काढणार नसल्याचे सांगत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पण, भविष्यात कोणताही पक्ष स्थापन झाला तर तो सर्वांचाच असेल, असं सांगण्यासही विसरले नाही. बिहारच्या विकासासाठी आपण काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बिहारची राजधानी पाटणा येथे पत्रकार परिषदेला संबोधित करत त्यांनी हे सांगितले. पुढील तीन ते चार महिन्यांत १८ हजार लोकांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

बिहार मधील लोकांच्या समस्या समजून घेऊन, त्यांच्या अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करेन. यासाठी २ ऑक्टोबरपासून मी पश्चिम चंपारणपासून तीन हजार किमीची पदयात्रा काढणार आहे. जन स्वराज संकल्पनेशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी बिहारच्या जनतेला आश्वासन देतो की, माझ्याकडे जे काही आहे ते मी बिहारच्या भल्यासाठी समर्पित करत आहे. या काळात कोणालाही मध्येच सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असंही त्यांनी पुढे सांगितलं.

यावेळी प्रशांत किशोर यांनी बिहारच्या आधीच्या सरकारांवर हल्लाबोल करत म्हटले की, लालू आणि नितीश यांच्या ३० वर्षांच्या राजवटीतही बिहार हे देशातील सर्वात मागासलेले आणि गरीब राज्य आहे. विकासाच्या अनेक मापदंडांमध्ये बिहार अजूनही देशातील सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. बिहारला आगामी काळात आघाडीच्या राज्यांच्या यादीत यायचे असेल, तर त्यासाठी नवा विचार आणि नव्या प्रयत्नांची गरज आहे. आणि हे फक्त मतदार जनताच करु शकते.

Prakash Harale: