नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचं दोन विभागात विभाजनं केल्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना आयोगानं मतदार संघांबाबत अंतरिम अहवाल आज सादर केला आहे. यामुळं जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूका घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अहवाल बनवण्यापूर्वी मतदारसंघ पुनर्रचना आयोगाच्या सदस्यांनी जम्मू-काश्मीरचा दौरा करुन राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटनांशिवाय सर्वसामान्य जनतेची मतंही जाणून घेतली होती. उद्या (शुक्रवार) या आयोगाचा कार्यकाळ समाप्त होत आहे. या आयोगातील सदस्यांची नवी दिल्लीत बैठकही पार पडली, त्यानंतर हा अंतरिम अहवाल सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, निवडणूक आयोग या वर्षाच्या शेवटीपर्यंत इथल्या निवडणुकांची घोषणा करु शकते, असं सांगितलं जात आहे. इथले विविध राजकीय पक्षही निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मतदारसंघ पुनर्रचना आयोगाचं कामकाज सुरु असतानाच, येथे पक्ष आपापल्या परीनं निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. जम्मू-काश्मीरच्या विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारनं मार्च २०२० मध्ये आयोगाची स्थापना केली होती. अंतरिम अहवालात जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या एकूण जागा ९० असतील. यामध्ये काश्मीर भागातून ४७ तर जम्मू भागातून ४३ जागांचा समावेश असेल.