सांगली | Maharashtra Kesari Women Wrestling Competition – महिला कुस्तीपटूंसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्रात आता महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा (Maharashtra Kesari Women Wrestling Competition) रंगणार आहे. ही महिलांची पहिलीच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असणार आहे. या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन सांगलीत (Sangli) करण्यात आलं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आज (14 मार्च) पुण्यात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेव मोहिते, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आणि पुणे शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अमोल बराटे उपस्थित होते.
या परिषदेच्या बैठकीमधील निर्णयानुसार सांगलीत 23 आणि 24 मार्च रोजी या स्पर्धा पार पडणार आहेत. महिला केसरी कुस्ती स्पर्धेचं सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीनं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच या स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेव मोहिते यांनी दिली आहे.
या कुस्ती स्पर्धेत दहा वजनी गटासह खुल्या गटांतील कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. त्यामध्ये 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 असे वजनी गट असतील. तसंच महाराष्ट्र केसरीसाठी 65 वजनी गटावरील मल्ल खिताबासाठी लढणार असून ही स्पर्धा फक्त मॅटवर होणार आहे.
महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्या महिला कुस्तीगीरास महिला केसरी खिताब आणि चांदीची गदा देऊन तिचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे कार्याध्यक्ष आणि सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान नामदेवराव मोहिते यांनी दिली आहे.