‘पहिलीच सोलर पाणीपुरवठा योजना’; नीरेेसाठी ४१ कोटी ५८ लाख रुपये योजनेवर होणार खर्च

राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
नीरा : नीरा ( ता.पुरंदर) येथे संपूर्ण भागात शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, याकरिता हर घर जल, जलजीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यांच्या माध्यमातून ४१ कोटी ५८ लाख रुपये खर्चाची संपूर्ण सोलरवर चालणारी नवीन पाणी योजना मंजूर झाली आहे. या योजनेमुळे ग्रामपंचायतीस झिरो वीज बिल येणार आहे. ही योजना राज्यातील ग्रामपंचायतीत पहिल्यांदाच मंजूर झाली असल्याची माहिती नीरा ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्री विराज काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी उपसरपंच राजेश काकडे, माजी जि.प.सदस्य विराज काकडे, चंदरराव धायगुडे, दीपक काकडे, विजय शिंदे, योगेंद्र माने, सुदाम बंडगर, हरीभाऊ जेधे, सुजित वाडेकर, ग्रा.पं.सदस्य अनंता शिंदे, वैशाली काळे, राधा माने, शशिकला शिंदे उपस्थित होत्या.

तेजश्री काकडे पुढे म्हणाल्या की, मागील काही वर्षांपूर्वी नीरा गावात फिल्टर योजना झाली. परंतु, नीरेतील काही भागात फिल्टर पाणी मिळत नव्हते तर काही भागांत कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. आम्ही पदभार स्वीकारल्यानंतर संपूर्ण नीरा गावाकरिता नवीन वितरण व्यवस्था होण्याकरिता नवीन योजना प्रस्तावित केली.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, आ. संजय जगताप यांच्यामुळे नीरेकरिता नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याचेही सरपंच तेजश्री काकडे म्हणाल्या. उपसरपंच राजेश काकडे म्हणाले की, नीरा गावाकरिता ४१ कोटी ५८ लाख ६७ हजार ९४८ रुपयांची सोलरवर चालणारी पाणी योजना मंजूर झाली. या योजनेत नदीला व कालव्याला पाणी नाही आले तरी ४५ दिवस संपूर्ण नीरेला पाणी पुरेल एवढा १६ कोटी १० लाख लिटर्सचा साठवण तलाव बांधण्यात येणार आहे. तसेच २९ किलोमीटरची वितरण व्यवस्था , एम.एस.ई.बी.चे ट्रान्सफार्मर, रस्ता खोदाई ही कामे आहेत.

या कामांची तरतूद या योजनेत करण्यात आलेली आहे. तसेच या योजनेकरिता पाईप शासन पुरविणार आहे. सध्या १५० ते १७५ एच.पी.च्या विद्युत मोटारीने नीरेला पाणी पुरवठा होतो तो नवीन योजनेत ४२ एच.पी.च्या मोटारीने होणार आहे. नीरेकरांना मीटर पद्धतीने २४ तास पाणी देण्याचा प्रयत्न असल्याचेही राजेश काकडे म्हणाले.

Dnyaneshwar: