सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर
पुणे | Pune News – एकिकडे पुण्यात (Pune) स्थानिक गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आहे. पुणे पोलिसांनीही अनेक उपक्रम राबवत गुन्हेगारीला चाप कसा बसेल याकडे लक्ष देत असताना दुसरीकडे पुण्यातूनच अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. राज्य गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
गेल्या काही वर्षामध्ये पुण्यात 5 हजार बांगलादेशी नागरिक वाढले असून इतरही जिल्ह्यात ही संख्या वाढल्याची चर्चा आहे. पोलीस बांगलादेशींवर कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्याने घुसखोरांचे फावल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे बांग्लादेशी नागरिकांची घुसखोरी हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असल्याचे दिसत आहे. पुण्यात बांग्लादेशी घुसखोर मोठ्या संख्येने स्थायिक झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात मागील काही वर्षात तब्बल 5 हजार बांग्लादेशी कुटुंबासह पुण्यात वास्तव्यास आहेत. मात्र, त्या तुलनेत मागील तीन वर्षांत केवळ 5 बांग्लादेशींना पुन्हा मायदेशी पाठवण्यात आले आहे.
कुटुंबासह येथेच वास्तव
हडपसर परिसरातील ससाणेनगर, वाघोली, चाकण औद्योगिक क्षेत्र, लोणीकाळभोर या भागात बांग्लादेशींनी आपले बस्तान बसवले आहे. सीमारेषा ओलांडत हे नागरिक भारतात येताच हॉटेल वेटर, बांधकाम मजूर, फेरीवाले आणि इतर कामे करतात आणि हळूहळू एक एक करत कुटुंबासह ते येथे स्थायिक होतात. समोर आलेल्या माहितीनुसार हे सर्व भाड्याची खोली घेऊन राहतात. तसेच आम्ही मूळचे पश्चिम बंगालचे आहोत, असे ते सांगतात.