माॅस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानाचं गुजरातमध्ये इमर्जन्सी लँडिंग, विमानात बाॅम्ब असल्याची मिळाली धमकी

गांधीनगर | माॅस्कोहून (Moscow) गोव्याला (Goa) येणाऱ्या विमानाचं गुजरातमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. या विमानात बाॅम्ब असल्याची धमकी (Bomb Threat) मिळाल्यामुळे गुजरातच्या जामनगर विमानतळावर त्याचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. तसंच या विमानात 236 प्रवासी आणि आठ क्रू मेंबर्स असल्याची माहिती आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी रशियाच्या दूतावासाला मिळाली होती. त्यांनी याबाबतची माहिती लगेच गोवा एअर ट्राफीक कंट्रोलला दिली. त्यानंतर रात्री 9.30 च्या सुमारास या विमानाचं जामनगरमधील इंडियन एअर फोर्स बेसवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

या विमानातील 236 प्रवासी आणि आठ क्रू मेंबर्सना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. तसंच घटनास्थळी गुजरात पोलीस, बॉम्ब शोधक पथक आणि एनएसजी कमांडो दाखल झाले असल्याची माहिती जामनगरचे जिल्हा दंडाधिकारी सौरभ पारघी यांनी दिली आहे.

दरम्यान, बॉम्बशोधक पथकाच्या तपासानंतर विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, अशी माहिती गुजरात पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Sumitra nalawade: