कोणाला काय मिळाले, यापेक्षा आपण काय गमावत आहोत याचा विचार जास्त महत्त्वाचा आहे. उद्योजकांप्रमाणेच वाहन चालवणाऱ्यांना वाहतुकीची किमान शिस्त पाळणे ही आवश्यक आहे.
पुण्याची वाहतूक व्यवस्था हा अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीचा विषय झाला आहे. यामध्ये रस्ते, वाहने आणि वाहनचालकांची शिस्त या सगळ्यावरच अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि याचा विचार होऊ शकत नसेल तर केवळ आंतरराष्ट्रीय कंपन्या पुण्यामध्ये आल्या म्हणून आपले शहर आंतरराष्ट्रीय होणार नाही, याची जास्त जाणीव आपण ठेवली पाहिजे. तीन आठवड्यापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांची सुपुत्र माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेदांत कंपनी शिंदे सरकारच्या अनास्थतेमुळे गुजरातमध्ये स्थलांतरित झाली, असा आरोप केला. ज्या तळेगावात वेदांत कंपनी येणार होती तिथे जाऊन आंदोलन केले. त्याचवेळी लिहिलेल्या अधोरेखितमध्ये आपल्याकडे विशेषतः या ज्या मोठ्या कंपन्या येतात त्यांच्यासाठी वाहतूक व्यवस्था, कामगार नियोजन, औद्योगिक धोरण, शैक्षणिक धोरण अशा प्रकारची पायाभूत सेवा सोयींची व्यवस्था आपण केली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता.
केवळ कंपन्यांशी चर्चा करणे आणि त्यांचे एखादे छोटे युनिट आपल्या औद्योगिक वसाहतीत येणे म्हणजे महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाला फार मोठी चालना देणे असा होत नाही. मात्र, राजकारणी मंडळींना यशाचे श्रेय घ्यायचे असते आणि अपयशाचे खापर दुसऱ्या कोणाच्या डोक्यावर फोडायचे असते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी वेदांत कंपनी गुजरातमध्ये जाण्यास शिंदे सरकार जबाबदार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आठ दिवसांतच वाहतुकीच्या गोंधळामुळे प्रख्यात चारचाकी वाहनाच्या अत्यंत उच्च पदस्थाला रिक्षातून प्रवास करत आपल्या ठरलेल्या ठिकाणी जावे लागले. वाहतूक व्यवस्था आणि त्याचे व्यवस्थापन अत्यंत ढिसाळ असल्यामुळे परदेशातील या उच्चपदस्थांना आपले वाहन सोडून रिक्षातून प्रवास करावा लागला. या सगळ्या प्रकाराला कोण जबाबदार आहे, याचा विचार आणि आत्मचिंतन होणे गरजेचे आहे.
हडपसरवरून कोथरूड किंवा त्यापुढे हिंजवडीकडे जाण्यास सकाळी, संध्याकाळी अडीच तीन तास लागत असतील, आणि प्रवासात आपली कार्यक्षमता संपून जात असेल तर कंपन्यांना हे परवडणारे नाही. तसेच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचाही अंत पाहणारे आहेत. चाकण, हिंजवडी येथे काम करणाऱ्या आणि शहराच्या दुसऱ्या टोकाला राहणाऱ्या अनेक कर्तबगार, कौशल्य अंगी असणाऱ्या आणि कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या अनेकांनी जाण्यायेण्याच्या त्रासामुळे आपली सेवा समाप्त केली आहे. किंवा शहराच्या दुसऱ्या टोकावरून अत्यंत चढ्या किमतीमध्ये सदनिका विकत घेऊन नोकरीच्या जागी निवास करण्याचे ठरवले आहे. यातून कोणाला काय मिळाले यापेक्षा आपण काय गमावत आहोत, याचा विचार जास्त महत्त्वाचा आहे. उद्योजकांप्रमाणेच वाहन चालवणाऱ्यांना वाहतुकीची किमान शिस्त पाळणे ही आवश्यक आहे.
–मधुसूदन पतकी