अमृता वाडीकर
दिल्लीतल्या प्रदूषणाची कायमच चर्चा होत असते. आताही भर उन्हाळ्यात ओझोनमुळे दिल्ली आणि आजूबाजूच्या भूभागातील चार कोटी लोकांचं जगणं अवघड झालं आहे. दुसरीकडे नागरिकांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी सरकारी आणि नागरी पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. काही प्रयत्नांना यश आलं आहे. अशा प्रयत्नांची संख्या वाढताना दिसणं ही निश्चितच दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
अनेक समस्यांनी ग्रस्त असणार्या दिल्लीमध्ये ओझोन वायू हीदेखील एक मोठी समस्या बनत आहे. या समस्येमुळेही राजधानीतलं प्रदूषण वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे प्रदूषण आदर्श प्रमाण ओलांडू लागलं आहे. त्याचा फटका दिल्ली आणि परिसरातल्या चार कोटी नागरिकांना बसतो आहे. प्रामुख्यानं उन्हाळ्यात ओझोन वायू तयार होतो. नायट्रोजन डायऑक्साइड (एनओ २), व्हीओसीस (अस्थिर सेंद्रिय संयुगं) आणि ऑक्सिजन सूर्यप्रकाशाशी संलग्न होतात तेव्हा ओझोन तयार होतो. नायट्रोजन ऑक्साइड वाहनं, वीज प्रकल्प आणि उद्योगांमधून निघणार्या धुरातून बाहेर पडतो. त्याची पातळी निश्चित मानकांपेक्षा वरच राहाते. उन्हाळ्यात ओझोन वायूची पातळी आठ तासांमध्ये १०० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा जास्त नसावी; परंतु ती साधारणपणे १५० ते २०० पर्यंत म्हणजेच जवळपास दुप्पट होते. वर्षानुवर्षं सतत वाढणारी उष्णता आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे आता उन्हाळ्यात दर दिवशी निर्धारित मानकापेक्षा ओझोन वायू जास्त दिसणं ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.
२०१८ मध्ये मार्च ते जून या काळात १०६ दिवस ओझोन वायूची पातळी निर्धारित मानकांपेक्षा जास्त होती. ही संख्या २०१९ मध्ये ११७ दिवस, २०२० मध्ये १२० दिवस आणि २०२१ मध्ये ११७ दिवसांपर्यंत वाढली. यंदाचा उन्हाचा कडाका आणि उष्णतेची लाट लक्षात घेता, हा आकडा १२२ दिवसांचा झाला तर आश्चर्य वाटायला नको. ओझोन वायू श्वसनाद्वारे शरीरात गेल्याने फुफ्फुसाचं नुकसान होण्याचा धोका वाढतो. ओझोनच्या किंचित उच्च पातळीमुळे छातीत दुखणं, खोकला, धाप लागणं आणि घसा खवखवणं यासारखे त्रास संभवतात. दम्याचा त्रास असणार्यांसाठी ही बाब अत्यंत धोकादायक आहे. अलीकडेच दिल्ली सरकारने उन्हाळ्यातल्या वायू प्रदूषणाविरुद्धच्या लढाईत १४ कलमी कृती आराखडा तयार केला आहे; परंतु त्यातही ओझोनसाठी कोणतीही योजना दिसत नाही. ओझोन वायूच्या प्रतिबंधाची योजना हाही कृती आराखड्याचा भाग असावा, असं पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे. ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट क्लीन एअर कॅम्पेन’चे प्रोग्राम मॅनेजर अविकल सोमवंशी यांच्या मते, उन्हाळ्यातलं प्रदूषण अगदी वेगळं असतं. यात वार्यासह धुळीची पातळी वाढते. त्यावर वाहनं, उद्योग आणि आगीच्या घटनांचा परिणाम होतो. तापमानदेखील खूप जास्त असतं. अशा स्थितीत ओझोन वायू तयार होऊ लागतो. हा प्रभाव कमी करण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणं, रस्ते धूळमुक्त ठेवणं आणि जंगलं वाचवणं आवश्यक आहे.
दिल्लीत एकाच ठिकाणी लाखो टन कचरा जमा होतो. नंतर या लँडफिल साइट्स कचर्यासह डोंगरात बदलतात आणि सडणं आणि विषारी वायुंमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात पसरतं. आता दिल्लीत एक उपाय शोधण्यात आला आहे, ज्यामध्ये कचर्यातली माती (जड) बाहेर काढून रस्त्याचा पाया मजबूत करण्यासाठी वापरली जात आहे. कचर्यापासून तयार होणार्या या मातीला ‘जड’ म्हणतात. दिल्ली-वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गाच्या एका विभागात या मॉडेलची अंमलबजावणी होत आहे. दिल्लीतल्या तीनही लँडफिल साइट्स (गाझीपूर, भालस्वा आणि ओखला) मधून काढलेले रस्ते अशाप्रकारच्या बांधकामासाठी देण्यात आले आहेत. इतर राज्यांमध्येही कचराभूमी नष्ट करण्यासाठी आणि पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी हे पाऊल अत्यंत प्रभावी ठरू शकतं. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेनं दिल्ली-वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गासाठी कालिंदी कुंज ते एनएचआय या मार्गासाठी एक लाख टनांहून अधिक जड प्रदान केलं आहे. राष्ट्रीय राजधानीत रिंग रोड म्हणून बांधण्यात येत असलेल्या अर्बन एक्स्टेंशन रोड-२ (बवाना ते द्वारका) मध्ये वापरण्यासाठीही ‘इनर्ट’ दिलं जात आहे. आतापर्यंत उत्तर दिल्ली महानगरपालिकेने या रस्त्यावर भरावासाठी एक लाख २२ हजार टन इनर्ट दिलं आहे. दिल्लीतल्या लँडफिल साइट्स खूप जुन्या आहेत. यामध्ये प्लास्टिकपासून विटा आणि ओला कचरा पूर्वी मिश्र स्वरूपात टाकला जात होता. लँडफिलची उंची कमी करण्यासाठी महानगरपालिकेने २०१८ पासून ट्रॅमल मशीन बसवल्या आहेत. तिन्ही लँडफिल साइटवर शंभरहून अधिक मशिन्स कचर्यापासून माती आणि प्लास्टिक वेगळं करतात.
दिल्लीत पुरेशा जागेअभावी हे जड इतरत्र टाकण्याची सर्वांत मोठी अडचण होती. त्यामुळे भराव टाकण्याची गरज असणार्या ठिकाणी महापालिका हे इनर्ट टाकत होतं. उद्यानांमध्ये खत म्हणूनही त्याचा वापर केला जात आहे. दिल्लीच्या तीन लँडफिल साइट्सबद्दल बोलायचं तर, त्या ठिकाणी सुमारे २७० लाख टन कचरा जमा आहे. कचर्याच्या विल्हेवाटीत सुमारे ७० टक्के म्हणजेच दिल्लीच्या लँडफिलमधील संपूर्ण कचरा साफ केल्यानंतर सुमारे १९३ लाख टन जड उपलब्ध होईल. ते एकाच ठिकाणी ठेवल्यास आणखी दोन लँडफिल तयार होतील. या कारणास्तव त्याच्या इतर उपयोगांचा विचार करताना, रस्त्यांच्या बांधकामात भराव करण्याचा पर्याय समोर आला आणि महत्त्वाचं म्हणजे तो यशस्वीदेखील झाला. रस्ता बांधकामात वापरल्या जाणार्या इनर्टमुळे नवीन लँडफिल साइटदेखील उभी राहणार नाहीत. मूळ विषयाकडे परतताना लक्षात घ्यायला हवं की, राजधानीची हवा खराब होण्याचं प्रमुख कारण रस्त्यावरील वाहनांची गर्दी हे आहे. पण मेट्रोचं जाळं वाढवून रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करता येईल. सध्या मेट्रोमुळे रस्त्यावर दररोज पाच लाख वाहनं कमी येत आहेत. चौथ्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोचं जाळं आणखी वाढेल; जेणेकरून जास्तीत जास्त लोक यातून प्रवास करू शकतील. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची कोंडी आणखी कमी होईल. दिल्लीच्या रस्त्यांवरील वाहनांच्या गर्दीमुळे लोकांचा मौल्यवान वेळ वाया जातो. खेरीज प्रदूषणातही वाढ होत आहे. परिणामस्वरूप वाहतूक कोंडीची समस्या सातत्यानं वाढत आहे. दुसरीकडे लोक मेट्रोनं कमी वेळेत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकतात. एका अभ्यासानुसार, मेट्रोमुळे दिल्लीतल्या नागरिकांच्या प्रवासाचा वेळ वाचत आहे. २०२१ मध्ये दिल्लीतल्या प्रवाशांचा एकूण २६.९ लाख तासांचा वेळ वाचला आहे. २०३१ मध्ये हे प्रमाण ५७.२५ लाख तासांपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. मेट्रोने प्रवास करून लोक पर्यावरणरक्षकाची भूमिका बजावत आहेत.