मुंबई | Amol Mitkari On Devendra Fadnavis – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. या सत्तासंघर्षानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी लागत आहे. या सत्ताबदलानंतर आता विरोधी पक्षातील नेते शिंदे गट आणि भाजपावर टीका करताना दिसत आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्र्यांना पीए ठेवलं आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानतो, असा खोचक टोला मिटकरी यांनी लगावला आहे. याबाबतचे वृत्त टीव्ही ९ मराठीनं दिलं आहे.
“आता पत्रकार परिषदेत दोन माईक घेतले आहेत. मुख्यमंत्रिपदाचा आदर केला त्याबद्दल आनंदच आहे. पण एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्र्यांना पीए ठेवलं. याबद्दल मी त्यांचे खरोखर आभार मानतो,” असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून पत्रकार परिषद सुरु असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरचा माईक खेचला होता. यावर देखील मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मागच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरेंना बोलायचे नसल्यास ते उपमुख्यमंत्र्यांना माईक द्यायचे. त्यानंतर अजित पवार प्रास्ताविक करायचे. उद्धव ठाकरे स्वत:हून माईक द्यायचे. देवेंद्र फडणवीसांनी परवा एक चिठ्ठी एकनाथ शिंदे यांना दिली. कोल्हापूरमध्ये शिंदे गटात सामील झालेल्या लोकांची नावे शिंदे यांनी घेतली. मात्र भाजपाच्या महाडिकांचे नाव त्यांनी घेतलं नाही. याची सल फडणवीस यांच्या मनात होती. माईक खेचला जातोय. उद्या काय काय खेचले जाईल, हे सांगता येत नाही,” अशी खोचक टीका देखील मिटकरी यांनी केली आहे.