कॉम्प्युटरमध्ये ३५०० अश्लील क्लिप्स!

बलात्कार प्रकरणी माजी आयएएस अधिकाऱ्याला सश्रम कारावास


पुणे : बलात्कार आणि विनयभंगप्रकरणी माजी आयएएस अधिकाऱ्याला सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. माजी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी मारुती हरी सावंत यास मार्च २०१५ मध्ये १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि अन्य तीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

त्याचबरोबर १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही घटना मार्च २०१५ मध्ये घडली होती. सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिताच्या कलम ३७६, ३५४, ५०६ आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण पॉस्को कायद्याच्या कलम ४, ६, ८, १० अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता. सावंत १९९८ च्या बॅचचा पदोन्नत झालेला आयएएस अधिकारी होता. या घटनेनंतर सरकारने मारुती हरी सावंत याला सेवेतून निलंबित केले.

अमानुषपणाचा कळस :
चॉकलेटचे आमिष दाखवत अत्याचार अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंत हा शिवाजीनगर येथील एका फ्लॅटमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होता आणि हिंगणे खुर्द येथील शाळेजवळील त्यांच्या सासरच्या अपार्टमेंटमध्ये वारंवार येत होता. याच ठिकाणी हा प्रकार झाल्याची माहिती आहे.

अनेक शाळकरी विद्यार्थिनी खेळाच्या मैदानावर खेळायला आल्या होत्या. तेथे सावंत त्यांना बिस्किटे आणि चॉकलेटचे आमिष दाखवत असे. त्यानंतर तो त्यांना फ्लॅटवर घेऊन जायचा. आणि याहीपलिकडे जाऊन त्यांना संगणकावर अश्लील चित्रफिती बघायला लावायचा. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. मुलींनी त्यांच्या शाळेतील समुपदेशकांना याबद्दल माहिती दिली.

समुपदेशक आणि पालकांनी याचे गांभीर्य ओळखत पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. यामुळेच तो शिक्षेस पात्र होऊ शकला. पीडितेने तक्रार केल्यास गुन्हेगारावर शिक्षा होऊच शकते. बलात्कार आणि विनयभंग हे दोन्ही गुन्हे नातेवाईक, ओळखीच्या व्यक्तीकडूनच होत असल्याचे आत्तापर्यंतच्या आकडेवारीतून उघडकीस आले आहे. शाळांमध्ये होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, पीडितांना सहाय्य करण्यासाठी प्रशासनाने अजूनही बरंच काही करणे गरजेचे आहे.

अनेकदा अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनांमध्ये दोषींना फाशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. हरी सावंत सारख्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याने असे कृत्य करून प्रशासकीय विभागाला काळे फासले आहे. त्याला झालेली शिक्षा ही बलात्कार गुन्हेगारीला वचक बसणारी ठरल्यास अत्याचारांच्या संख्येत घट होईल.

Prakash Harale: