माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे ९२ व्या वर्षी निधन

नवी दिल्ली :

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री आठ वाजता त्यांची तब्येत खालावली होती. त्यांना श्वसानाचा त्रास होऊ लागला होता, त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ दरम्यान काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारचे पंतप्रधान होते. भारताचे १४ वे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देशातील आर्थिक सुधारणांचे जनक मानले जाते. त्यांच्या निधनानंतर देशात शोककळा परसलीय. देशातील अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान १९९१ मध्ये अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांनी भारतात आर्थिक उदारीकरणाचा पाया घातला, ज्यामुळे जागतिक स्तरावर देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे ३ एप्रिल २०२४ रोजी राज्यसभेतून निवृत्त झाले. तब्बल ३३ वर्षांच्या संसदेतील कारकीर्दीनंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली. मनमोहन सिंग यांच्या अनेक निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे रुप बदलले. मनमोहन सिंग १९९१ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर गेले होते. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्र्याची जबाबदारी सांभाळली होती.

Rashtra Sanchar Digital: