पाणीदार-केंदूर प्रकल्पाला पावणेचार कोटी मंजूर

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या वतीने प्रशासकीय मंजुरी

या सात वस्त्यांना होणार लाभ
माजी उपसभापती राजेंद्र रासकर, माजी सरपंच राजेंद्र ताठे, शिवाजी डेरे यांच्या आग्रही मागणीमुळे माळीमळा येथील पाझर तलावाने आणि पर्‍हाडमळ्यातील शेतकर्‍यांच्या मागणीमुळे होणार्‍या दोन्ही कामांमुळे सुक्रेवाडी, माळीमळा, भोसुरेस्थळ, जगतापवस्ती, रासकर वस्ती, ताथवडेवाडी, तवलीबेंद आदी वस्त्यांना मोठा लाभ होणार असून दोन्ही कामांमुळे तब्बल ००. १० टीएमसी पाणी नव्याने उपलब्ध होणार असल्याचे सरपंच अविनाश साकोरे यांनी सांगितले.

शिरूर : गेली दोन वर्षे भूजलपातळी वाढविण्यासाठी झटणार्‍या पाणीदार – केंदूर (ता. शिरूर) प्रकल्पासाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या वतीने एक साठवण तलाव व एक कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍यासाठी तब्बल ३ कोटी ७८ लाखांच्या निधीला नुकतीच प्रशासकीय मंजुरी मिळाली. पुण्याचे अतिरिक्त आयकर आयुक्त प्रशांत गाडेकर व पाणीदार केंदूर टीमच्या यांच्या पाठपुराव्याने ही दोन्ही कामे लवकरच होणार असून यावर्षी तब्बल १०० एकर गायरानावर हत्ती गवत लावण्याचा उपक्रमही हाती घेण्याचे ठरल्याची माहिती सरपंच अविनाश साकोरे, उपसरपंच योगिता थिटे तसेच पाणीदार केंदूरच्या वतीने सूर्यकांत थिटे यांनी दिली.

जलस्वयंपूर्णतेच्या दृष्टीने केंदूरमध्ये यशदाचे समन्वयक डॉ. सुमंत पांडे यांच्यासह पुण्याचे अतिरिक्त आयकर आयुक्त प्रशांत गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन वर्षे गावात सर्व ओढा खोलीकरण-रुंदीकरण व विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. मागील वर्षी गायरानावर ५० हजार झाडांची लागवडही करण्यात आली. गाडेकर यांनी जलसंधारण महामंडळाकडून काही निधी मिळतो का याची चाचपणी केली असता पाणीदार केंदूरच्या मदतीला जलसंधारण महामंडळ आले.

दरम्यान, प्रशासकीय पातळीवर शाखा अभियंता सुजाता हंडे व गृहमंत्री वळसे पाटील यांचे सचिव भोर यांनी मदत केल्याचेही थिटे यांनी सांगितले. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून पहाडमळा येथील साठवण तलावासाठी १ कोटी ६ लाख ९९ हजार ३०६ रुपये तर माळीमळा कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍यासाठी २ कोटी ७१ लाख २ हजार १८१ रुपये असे एकूण ३ कोटी ७८ लाख १ हजार ४८७ रुपये एवढा निधी पाणीदार-केंदूरसाठी प्रशासकीय मंजुरीद्वारे मिळत असून लवकरच ही दोन्ही कामे सुरू होणार असल्याची माहिती या प्रकरणी पाठपुरावा करणारे माजी सरपंच सुवर्णा थिटे, सुनील थिटे, रमेश थिटे, भाऊसाहेब थिटे, सतीश थिटे, शाहूराज थिटे यांनी दिली.

Prakash Harale: