नयनतारा आय क्लिनिकतर्फे १३ मोतिबिंदू शस्त्रक्रिया
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासपुरुष असून, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतिपथावर जाईल, असे माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे नयनतारा आय क्लिनिक यांच्या सहकार्याने आयोजित नेत्रतपासणी आणि मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिबिर संयोजक क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, मुकुल माधव फाउंडेशनचे जितेंद्र जाधव, योगेश रोकडे, नयनतारा आय क्लिनिकचे डॉ. अनिल परांजपे, डॉ. मेधा परांजपे, ॲड. मिताली सावळेकर, महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, ॲड. प्राची बगाटे, रामदास गावडे आदी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्ताने गरजू व्यक्तींची संपूर्ण आरोग्य तपासणी हे स्पृहणीय कार्य असून, कोरोनानंतर नागरिकांमध्ये आरोग्याप्रति जागरूकता वाढली आहे. महागड्या औषधोपचारामुळे आणि स्वतःच्या व्यापात प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. वस्ती विभागात हे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे मोफत आरोग्य तपासणी आवश्यक असल्याचे मत मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
नेत्रतपासणीबरोबरच गरजू व्यक्तींची मोतिबिंंदू शस्त्रक्रियादेखील मोफत करण्यात येत असून क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुल माधव फाउंडेशनचे हे खरे सेवाकार्य असल्याचे शहराचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले. शासकीय यंत्रणेतून आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्या तरी अजूनही मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिक ह्या सुविधांपासून वंचित आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन ह्या सुविधा वस्ती विभागातील प्रत्येकाच्या दारापर्यंत नेणे कौतुकास्पद असल्याचेही राजेश पांडे म्हणाले. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुल माधव फाउंडेशन यापुढील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य संपन्नतेसाठी कार्य करणार असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले. या शिबिरात १३ जणांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.