पुणे – The Hemp Cafe | भांग म्हटलं की, अमली पदार्थ ही आपली ठाम समजूत. त्याला अनेक कायदे आणि निर्बंधाची जोड. साहजिकच हे प्रकरण धोकादायक, मात्र भांगेच्या बियांपासून पुण्यामध्ये धडपड्या उद्योजकांनी चक्क उत्तम खाद्यपदार्थ आणि पेय तयार करून वेगळी बाजारपेठ तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. भांगेबद्दल असणार्या आपल्या पारंपरिक समजुतींना धक्का देत त्या पदार्थांचा आणि पेयांचा आस्वाद घ्यायला आपण द हेम्प कॅफेटेरियाला एकदा भेट दिली पाहिजेच.
आजवर आपण अनेक कॅफे बघितले असतील, ज्या कॅफेमध्ये बर्गर, पिझ्झा, सँडविच खाल्ले असतील. पण पुण्यात एक असे कॅफे उघडले आहे, ज्या कॅफेत भांगेच्या बियांपासून सँडविच, पिझ्झा आणि बर्गर बनविले जाते. द हेम्प कॅफे असे या कॅफेचे नाव आहे. म्युझियमचे कॉम्बिनेशन असलेले हे कॅफे अमृता शितोळे व अमृता खैरे यांनी सुरू केले आहे. या कॅफेत जे पदार्थ बनविले जातात ते पदार्थ भांगेच्या बियांपासून बनविले जातात. या भांगेवर अभ्यास करून अमृता हिने भांगेच्या बियांपासून होणारे फायदे सर्वसामान्य नागरिकांना कळावे यासाठी हे कॅफे सुरू केले आहे.
भांगेचे बियाणे म्हणजेच हेम्प सीड म्हटले जाते. या बियांना आपल्याकडे आहारीय पदार्थ म्हणून मान्यता नाही. कारण या बियांपासून पुढे जे काही उत्पादन होते, ते व्यसनाधीनतेच्या विळख्यात घेऊन जाऊ शकतात. याची जास्त माहिती लोकांना नसल्याने भांगेचे बियाणे म्हणून याकडे पाहू नये. हे बियाणे आहारीय वनस्पती असल्याने याच्या वापरावर कुठलीही बंधने नाहीत. भारतात गेल्या अनेक वर्षांपासून आहारात वापरली जाते. त्यामुळे यावर संशयाचा प्रश्न नाही. पण या बियाणांचा जमिनीशी संपर्क झाल्यानंतर ज्या प्रकारची वनस्पती उगवते ती आपल्याला अतिशय त्रासदायक आहे.
भांगेचा अभ्यास केला तर भांगेच्या झाडांपासून नशाही होत असते. तिच्या बियांपासून कोणतीही नशा होत नाही. तर उलट या बियांपासून शरीरास उपयुक्त गुणधर्म मिळतात आणि याचा फायदा हा कर्करोग, टीबी, तसेच मानसिक आजार असलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात होत असतो. हेच विचारात घेऊन आम्ही या बियांपासून विविध पदार्थ बनवत असल्याचे यावेळी शितोळे यांनी सांगितले आहे. या बियांमध्ये ओमेगा ३, ६, ९ असल्याने हे मेंदूला व शरीरास अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे याचा आरोग्यावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नसल्याचे अमृता शितोळे यांनी दै. ‘राष्ट्रसंचार’शी बोलताना सांगितले.