निष्फळ चर्चा

मनसे सर्वेसर्वा राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात समेट होणार का, अशी चर्चा सध्या सुरू आहे. ही चर्चा फार काळ टिकणार नाही, तसेच फलदायक असेल, असेही नाही. याचे कारण दोन्ही नेते आपल्या पक्षाचे पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून मग निर्णय घेणार आहेत.राजकीय महत्त्वाकांक्षा केवळ राजकारण करणाऱ्या नेत्यांनाच असते असे नाही, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही असते. हे पक्ष एकत्र आले, तर राजकारणात पुढे जाण्याची जागा, शक्यता कमी होणार म्हणून दोघे एकत्र येणे अवघड आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे.राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी, उद्धव ठाकरे यांनी साद घातली, तर पुढे पाहता येईल असे सांगितल्याने नक्की काय होणार असा चर्चेचा सूर आहे. त्यातून राज ठाकरे आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून मग एकत्र येण्याचा निर्णय घेतील.तो सकारात्मक असेल वा नकारात्मक. मात्र दोन्ही नेते आपल्या कार्यकर्त्यांच्या विचाराशिवाय निर्णय घेणार नाहीत, हे नक्की आहे. आता हे दोघे एकत्र येतील याचा दोघांना फायदा काय किंवा अडचणी कोणत्या यावर विचारमंथन नक्की होईल.या सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सत्तेची आकांक्षा सगळ्याच राजकीय मंडळींना असते.नेत्यांना तर अधिक असते. त्यासाठीच तर वेगळा पक्ष काढला जातो. अस्तित्व जाणवून दिले जाते. राज ठाकरे यांची शिवसेनेत होत असलेली घुसमट आणि त्यांना दिली जात होती ती वागणूक सहन न होऊन त्यांनी शिवसेनेचा त्याग केला. दुसरा पक्ष काढला. उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्ष पिढीजात मिळाला. त्यांना तो टिकवायचा आहे.

आज त्यांची राजकीय िस्थती फारशी बरी नाही. ते एकटे पडले आहेत असे शर्मिला ठाकरे यांनी मान्य केले. पक्षातले महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर निघून गेले आहेत.केवळ गेले नाहीत तर सरकार स्थापन करुन सत्तेत आहेत. अशावेळी शिवसेना कोणाची हा कळीचा मुद्दा निर्माण झाला आहे. मंगळवारी निर्णय उद्धव ठाकरे यांच्या विरोधात लागला, तर शिंदे गटाऐवजी उद्धव ठाकरे गटाला कोणत्या तरी पक्षात सहभागी होण्याशिवाय पर्याय नाही. त्यांचे सगळे मिळून पंधरा सदस्य आहेत, तर एकनाथ शिंदे यांचे चाळीस. उद्धव ठाकरे ज्या गटाला साद घालतील त्यांच्याकडे केवळ एक सदस्य विधानसभेत आहे.विधानसभेत फार मोठा फरक पडणार नाही. आता मुद्दा दुसरा उरतो तो मुंबई महापालिका निवडणुकीचा.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघे एकत्र आले, तरी मुंबई महापालिकेची सत्ता मिळवू शकतील, असे काही दिसत नाही. गेल्या वेळी मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेने पळवले होते. ती जखम मनसे विसरला नाही. मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे हे तर ती जखम वारंवार बोलून ताजी ठेवतात.

दुसरा पक्ष शिवसेना आणि भाजपामध्ये महापालिका निवडणुकीत केवळ दोन जागांचे अंतर होते. त्यातून मुंबई आता उद्धव ठाकरे यांचा करिश्मा कितपत चालणार हा पण प्रश्नच आहे. अशा वेळी मनसे आणि शिवसेना किती गुण्यागोविंदाने नांदतील हा पण कळीचा मुद्दा आहे. मनसेने विशेषतः राज ठाकरे यांनी त्यांच्या गुडी पाडव्यापासून सुरू केलेल्या प्रचारमाहिमेत उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. राणा दांपत्याववरून झालेल्या विवादात राणांची बाजू घेतली होती. औरंगाबादच्या नामकरणावरून ‘‘कोण तुम्ही? असा प्रश्नही जाहीरपणे विचारला होता. उद्धव आणि राज यांच्यात जाहीर भाषणातून कलगीतुरा रंगला होता. आरोप -प्रत्यारोप झाले होते. आता एकत्र येणे किती सहज, अवघड आहे हे लहान मुलगाही सांगेल. मात्र सत्तेकरता, स्वार्थासाठी कोण एकत्र येईल हे सांगता येत नाही.

तसेच या दोघा भावांबद्दल आणि राजकीय, सामाजिक,आर्थिक लाभासाठी एकत्र येण्याचा विचार असेल तर त्यांच्याबद्दल अजिबात भरवसा देता येत नाही. अर्थात राज ठाकरे यांच्या कोणत्याच कृतीबद्दल विश्वास ठेवता येत नाही.एकदा मोदीविरोधक, तर दुसऱ्या वेळी माेदीसमर्थक, असा त्यांच्या विचारांचा लंबक हलत असतो.त्यांच्यावर उद्धव ठाकरे का विश्वास ठेवतील? सगळ्याच निवडणुकीत जागावाटप कसे कारणार ? राज ठाकरे दोन्ही काँग्रेसला सबोत घेणे मान्य करतील का? उद्धव ठाकरे एकाकी पडलो म्हणून राज ठाकरे त्यांना साद घालतील का आणि त्याला राज प्रतिसाद देतील का, असे अनेक प्रश्न आहेत. मनसे कार्यकर्ते जागा वाटपाच्या वेळी कमी जागा मान्य करणार नाहीत, असे सध्या तरी जाणवते. दोघांनाही ध्येयधोरणात असणारी पारदर्शकता राखणे गरजेचे आहेे हे नक्की अन्यथा चर्चा निष्फळ आहे.

Nilam: