अमित देशमुख यांची ग्वाही
कोल्हापूर : ‘राज्य नाट्य स्पर्धांना ६० वर्षांची परंपरा आहे. स्पर्धेने अनेक कलावंत दिले. ही परंपरा सांस्कृतिक कार्य संचालनालय जोपासत आहे. मराठी नाट्य क्षेत्राला नवे काय देता येईल, याचा विचार करताना अंतिम फेरीत जे नाटक अव्वल ठरेल अशा नाटकाच्या प्रयोगाला व्यासपीठ दिले जाईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.
मुंबई चित्रनगरीच्या धर्तीवर कोल्हापूरची चित्रनगरीही विकसित व्हावी, २४ तास चित्रीकरण सुविधा सुरू व्हावी, जेणेकरून मराठी हिंदीच नव्हे, तर प्रादेशिक भाषेतील चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण होऊ शकेल, अशा सुविधा देण्यासाठी मंजुरी देत आहोत. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही,’’ अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी येथे दिली.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणार्या हीरकमहोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी केशवराव भोसले नाट्यगृहात आजपासून सुरू झाली. अभिनय, दिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा आदी कलांत सरस ठरणार्या कलावंतांना मुंबईतील मनोरंजन क्षेत्रात संधी देण्यासाठी त्यांच्या ऑडिशनही घेतल्या जातील.’’ पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘‘चित्रतपस्वी भालाजी पेंढारकर, व्ही. शांताराम अशा दिग्गज कलावंतांपासून कोल्हापूरची चित्रपट परंपरा सुरू आहे. नव्या काळात चित्रपटनिर्मिती भक्कम करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. चित्रनगरीत मराठी हिंदी चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण होत आहे, तरीही गगनबावडा, विशाळगड, पारगड, पन्हाळा आदी भागात चित्रीकरण व्हावे, अशी स्थळे विकसित करण्यात येत आहेत. येथे चित्रीकरण पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास रोजगारालाही बळ मिळेल.’’