‘गदर 2’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं अमीषा पटेलबाबत धक्कादायक विधान; म्हणाले, “ती फार चांगली अभिनेत्री नव्हती, तरीही…”

मुंबई | Gadar 2 – बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल (Amisha Patel) ही ‘गदर 2’ (Gadar 2) या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पण, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अमीषा पटेलनं ‘गदर 2’च्या दिग्दर्शकांवर आणि प्रॉडक्शन हाऊसवर काही आरोप केले होते. चित्रपटाच्या सेटवर कोणत्याही सुविधा दिल्या जात नसल्याचं तिनं म्हटलं होतं. तर आता ‘गदर 2’चे दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी अमिषाबाबत मनमोकळेपणानं भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी तिच्याबाबत काही धक्कादायक खुलासेही केले आहेत.

अनिल शर्मा यांनी अमीषाबाबत सांगितलं की, ती एका श्रीमंत घरातून आली आहे. कधी कधी तिच्या स्वभावातून तिचा अॅटिट्यूड दिसून येतो. तसंच जेव्हा तिची ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटासाठी निवड करण्यात आली होती तेव्हा ती चांगली अभिनेत्री नव्हती. आम्हाला सकिनाच्या भूमिकेसाठी चंद्रासारखा चेहरा असणारी अभिनेत्री हवी होती. त्यामुळे आम्ही अमीषा व्यतिरिक्त आणखी एका अभिनेत्रीची निवड केली होती. तेव्हा अमीषा अभिनयात खूप कमकुवत होती, मात्र आम्ही थोडा विचार केला आणि अमीषावर शिक्कामोर्तब केलं.

अमीषा ही मोठ्या घराण्यातील सुंदर मुलगी होती त्यामुळे तिला ते व्यक्तिमत्तव शोभणारं होतं. तिनं सकीनाच्या भूमिकेसाठी सहा महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं होतं. माझ्याकडे ती दररोज 5 ते 6 तास प्रशिक्षण घ्यायला यायची. त्यानंतर तिला सकीनाची भूमिका चांगल्या पद्धतीनं साकारता आली, असा खुलासा अनिल शर्मा यांनी केला आहे.

admin: