अनिरुद्ध बडवे
पुणे : राज्यातील सर्वात शांत , सभ्य आणि प्रतिष्ठितांचे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे आणि या पुण्याला ज्या परिसराने ही ओळख करून दिली तो कोथरूड भाग सध्या सर्वात असभ्य , अप्रतिष्ठित आणि अशांत झालेला दिसून येतो. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये एकाच विभागातून सर्वाधिक लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाची पदे देणारा हा परिसर असा अस्वस्थ का ? याचे उत्तर लोकप्रतिनिधींच्या उदासीकरणात शोधायचे की त्यांनीच केलेल्या गुंडगिरीच्या उदातीकरणात शोधायचे ? यामध्ये कोथरूडकर चिंताग्रस्त आहे .
मकोका टिकणार का ?
कुप्रसिद्ध गुंड गजा मारणे याला आज 3 मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. परंतु आजपर्यंत अनेकदा तडीपारी, स्थानबद्धता , सुरक्षिततेचा उपाय म्हणून अटक अशा अनेक कारवाया झालेल्या गजा मारणे हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मोकाट सुटेल , अशीच चर्चा आता खुद्द राजकारण्यांपासून ते सामान्य नागरिक देखील करत आहे. गजा मारणे याला धाडसाने मकोका लावण्यात आला .
परंतु तो मकोका टिकणार का ? ही शंका आणि भीती कोथरूडकर यांच्या मनात आहे. कारण आज पर्यंत काही नेत्यांना मकोका लावून पुन्हा त्यातून सही सलामत बाहेर आणण्यात देखील काही लोकप्रतिनिधींचा सहभाग होता हे पुणेकरांनी उघड्या डोळ्याने पाहिले आहे.
सातत्याने व्यवस्थेची आणि यंत्रणेची कवच कुंडल असलेला गजा मारणे आणि त्याचे साथीदार हे सातत्याने मस्तीखोर मानसिकतेमध्ये असतात हे अनेकदा दिसून आले आहे . आजही गजा मारणे आणि रुपेश मारणे या दोघांनी आपल्या साथीदारांना ‘‘मस्ती आली आहे साल्याला मारा, ’’असे म्हणून चिथावणी दिली असल्याचा दावा पोलिसांनी आज न्यायालयात केला . विशेष न्यायालयाने गजा मारणे याला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला आहे.
आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण चालू असून तपासादरम्यान उपलब्ध होणार्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे काय याबाबत तपास करायचा आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत दोन अॅक्टिव्हा जप्त करण्यात आल्या आहेत.
कार्यकर्त्याला झळ पोहोचली म्हणून… ?
गजा मारणे याच्या कृष्णकृत्या बद्दल गेल्या अनेक वर्षांपासून माध्यमे ओरडत आहेत. अनेक प्रकरणात त्याचे नाव आले . पोलिसांनी देखील त्याच्यावर कधीही इतक्या धाडसाने कारवाई केली नाही. परंतु केंद्रीय मंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांच्या एका कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणी नंतर नामदार मोहोळ यांनी आक्रमक होत पोलिसांना कारवाई करणे भाग पाडले.
मकोका सारखी कारवाई करण्यासाठी एका राजकीय कार्यकर्त्याला झळ पोचवण्याची वाट पुणेकरांना पहावी लागली. परंतु काळाची पाऊले ओळखून मोहोळ यांनी आक्रमकता दाखवत पोलिसांना हे करणे भाग पाडले , याचेही अप्रूप आता राजकारणीच दाखवत आहेत. शांतता प्रिय ,सभ्य कोथरूडकर आणि पुणेकर मात्र या कारवाईमुळे सुखावला आहे. मुरलीधर अण्णा यांनी अशीच अण्णागिरी सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी चालवावी अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
मारणेला कर मारण्यासारखे
तो करतोय रडल्यासारखे
गजा मारणे हा अनेक लोकप्रतिनिधींचा आणि राजकारण्यांचा स्नेही आहे हे आता लपून राहिलेले नाही. आजपर्यंत त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी झाल्या, गुन्हे दाखल झाले माध्यमांमध्ये ओरड झाली तरी देखील त्याला अप्रत्यक्षपणे संरक्षण देण्यात आले. त्याच्या 50 हून अधिक प्रॉपर्टी जप्त करण्याचे आदेश निघाले. प्रत्यक्षात कुठलीही धाडसी कारवाई त्याच्यावरती झाली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि गजा मारणे यांची भेट मोठी चर्चेत आली होती. त्यानंतर खासदार निलेश लंके यांनीही त्यांची भेट घेतली. ना. चंद्रकांत पाटील यांनी तर गजा मारणे यांच्या दहीहंडी कार्यक्रमात जाऊन उपस्थिती लावली. त्यापूर्वी मारणे यांच्या पत्नी यांनी मनसेची उमेदवारी घेतली तर काही काळ त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील जाऊन आल्या. त्यामुळे गजा मारणे हा सर्वपक्षीय मित्र आहे हे स्पष्ट आहे.
निवडणुका जिंकण्यासाठी साम दम दंड भेद अशा चारी अस्त्रांचा वापर करत असताना गजा मारण्यासारखे गुंड आपल्या पदरी असावेत ही देखील कदाचित या आधुनिक लोकशाहीची मजबुरी असावी.
कोथरूडमध्ये अनेक डॉन
कोथरूडच्या नळ स्टॉप चौकात भरधाव वेगाने गाड्या चालवणाऱ्या टू व्हीलर वाल्यांपासून ते आजूबाजूच्या टेकडीच्या कडे कपारात अमली पदार्थांचे व्यवसाय करण्यापर्यंत अनेक गुंड उपजले आहेत. आजपर्यंत अनेक डॉन उदयास आले काहींना पोलिसांनी संपवले तर काहींनी आपापसातल्या टोळ्यांमध्ये संघर्ष करूनच स्वतःला संपून घेतले. परंतु दीर्घ काळापर्यंत त्या गुंडगिरीच चर्चेत राहणारा गजा मारणे हा गेल्या दहा वर्षातील एकमेव अपवाद आहे.
कोथरूडमध्ये एका महिन्याला सरासरी 10 गुन्हे घडत असतात. येथे साध्या पाकीट मारी , चेन हिसकावून घेण्यापासून ते आर्थिक भ्रष्टाचार आणि हत्या करण्यापर्यंत अनेक गुन्हे सातत्याने घडत असतात.
कदाचित कोथरूड हे सर्वात मोठे आर्थिक हब म्हणून पुढे येत असल्यामुळे येथे गुन्हेगारी देखील छुप्या पावलाने रुजत असल्याचे दिसते. दोन दिवसांपूर्वी तर किरकोळ वादातून चक्क गोळी झाडून आणि तलवारीने वार करून 10 जणांच्या टोळक्याने एका तरुणाचा निर्गुण खून केल्याची घटना घडली .
कोथरूडमध्ये सर्वात सभ्य मानल्या जाणाऱ्या शास्त्रीनगर येथे दत्त मंदिराजवळ हा प्रकार घडला .
कोथरूडचा कुठलाही भाग आता सुरक्षित राहिलेला नाही हेच यावरून दिसून येते. या गुंडांचे धाडस , त्यांच्याकडे येणारी हत्यारे , सर्रास बंदुकांचा वापर , नंग्या तलवारी नाचवणे हे प्रकार पोलिसांना कसे दिसत नाहीत ? याचे आश्चर्य येथे नागरिकांना वाटत राहते.
पोलिसांना फ्रीहँड का नाही ?
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी येथे रुजू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुंडांची परेड घेतली. त्यावेळी सर्व माध्यमांनी किती करारी आणि धाडसी आयुक्त लाभला आहे याचे गुणगौरव केले. परंतु गुंडगिरी मध्ये काहीही फरक पडला नाही. स्वतः देवेंद्र फडणवीस हे त्या खात्याचे मंत्री असल्यामुळे ते मजबुरीने या सगळ्या खात्याला अंजारून जी गोंजारून घेतात, पोलिसांचे मनोबळ वाढविले तर ते कार्यक्षम होतील असा त्यांचा आशावाद असावा, परंतु स्पष्ट वक्ते असणारे अजित पवार यांनी मात्र आयुक्तांची चांगलीच खर्डपट्टी काढली होती. चंद्रकांत दादा हे फारसे आक्रमक नाहीत परंतु त्यांनी कोथरूडच्या सुरक्षेसाठी आग्रही भूमिका घेतली पाहिजे अशी सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा आहे. कार्यकर्त्यांवरती हल्ल्यामुळे मुरलीधर मोहोळ जसे आक्रमक दिसले तसे त्यांनी कायमस्वरूपी आक्रमक असावे असे कोथरूडकरांना वाटते. पोलिसांना जर फ्रीहँड दिला आणि कुठल्याही आजी, माजी महापौर, नगरसेवक, आमदार, मंत्र्यांनी फोन केले नाहीत तर यातील गुंडगिरी निपटून काढण्यात पोलीस हे सक्षम आहेत. परंतु त्यांना तसे काम करू दिले पाहिजे अशी चर्चा खुद्द पोलीस प्रशासनामध्येच आहे.
भाजपाकडून अपेक्षा
या सगळ्या पार्श्वभूमीवर अशांत असलेला कोथरूड आता शांत व्हावा एक केंद्रीय मंत्री, राज्याचे दोन मंत्री, राज्यसभेचे खासदार इतकं सगळं कोथरूडला देऊन देखील भाजपा महायुतीचे सरकार कोथरूड शांत ठेवू शकत नसेल तर कुठेतरी कोथरूडकाराचा हा विश्वास सांभाळण्यात पक्ष कमी पडला असेच म्हणावे लागेल.