मुंबई | Gajanan Kale On Sanjay Raut – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बेळगावमध्ये ‘कन्नड रक्षण वेदीके’ सारख्या संघटनांकडून महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड झाल्यानंतर महाराष्ट्र – कर्नाटक वाद चांगलाच पेटला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर दावा केला आहे. “कन्नड वेदिका संघटनेनं महाराष्ट्रात येऊन माझ्यावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे”, असा आरोप संजय राऊतांनी केला. यावरून मनसेनं आता संजय राऊतांवर खोचक शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे.
“कन्नड वेदिका संघटनेनं महाराष्ट्रात येऊन माझ्यावर हल्ला करण्याची धमकी दिली. हा माझ्यावरील हल्ला नसेल तर हा महाराष्ट्रावरील हल्ला असेल. यावर भाजप काही बोलणार आहे की थंडपणे पाहणार आहे? शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन तिकडच्या संघटना धमक्या देतात, हल्ले करू म्हणतात यावर भाजपनं बोलावं”, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
यावरून मनसेचे (MNS) प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी ट्विटद्वारे संजय राऊतांवर टीका केली आहे. “सौ दाऊद ज्यांना घाबरतात त्यांना धमकी आल्याचं कळतंय. काळजी करू नका सरकार संरक्षण देईलच पण जर शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर संजय राऊतांना महाराष्ट्र सैनिक छातीचा कोट करून सुरक्षा पुरवतील. मात्र, चर्चेत राहण्यासाठी अश्या काड्या पिकवू नका. खरंच यांना धमकी आली का पाहावं सरकारनं”, अशी मागणीही काळेंनी केली आहे.