पुणे : (Gajanan Kirtikar On Sanjay Raut) येथिल पत्रकार परिषदेत शिंदे गटात गेलेल्या खासदार गजानन किर्तीकर यांना पत्रकारांनी जुने सहकारी शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांचा वाढदिवस असल्याने तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या का?, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना कीर्तीकर म्हणाले, त्याना शुभेच्छा देण्यासाठी मी तीन वेळा फोन केला. मात्र त्यांनी माझा फोनकॉल उचललाच नाही. त्यांनंतर मेसेज करून शुभेच्छा दिल्या, अशी भावनिक प्रतिक्रिया खासदार गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केली.
यावेळी कीर्तीकर यांनी आपल्यावर उद्धव ठाकरे यांनी कसा अन्याय केला याचा पाढाच वाचला. ते म्हणाले, मला बाळासाहेबांनी २००४ निवडणुकीत तिकिटं दिलं. त्यावेळी उद्धव ठाकरे विरोध करत होते. तसेच २००९ च्या निवडणुकीतही माझे तिकीट कापले. २०१४ मध्ये एनडीएमध्ये मला मंत्रिपद न देता सावंत याना मंत्रीपद दिलं, गटनेतेपदाच्या वेळीही मला डावलले. हे सगळे अपमानास्पद आहे. म्हणूनच मी शिंदे गटात गेलो.
शिवसेनेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसोबत गेल्यामुळे पक्ष कमजोर होत चालला आहे. बाळासाहेबांच्या विचारांसाठीच मी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे कीर्तीकर म्हणाले. मी माझे आयुष्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतच घालवणार असल्याचेही ते पुढे म्हणाले.