भिडेवाड्यात जुगार अन् दारू पार्ट्या!

वाडा उरला केवळ जयंती-पुण्यतिथीपुरताच…

या ठिकाणी केवळ महात्मा फुले, तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंती, तसेच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातो. त्याव्यतिरिक्त इथे ना कोणी लोकप्रतिनिधी फिरकतो, ना कोणी सरकारी अधिकारी. तर समाजसेवक आणि फुले विचारांचे अभ्यासकही यावर काहीही बोलत नाहीत. त्यामुळे ऐतिहासिक अशा या वाड्याचे पावित्र्य राखले जावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे. खरंतर ही ओळख महात्मा फुले यांनी दिली, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. महात्मा फुले यांनी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढून प्रथमच शिक्षणाची बीजे रोवली. अशा पवित्र भिडेवाड्याची आज दुरवस्था झाली आहे. आता तर या शैक्षणिक भिडेवाड्यात अक्षरशः जुगार अन दारूच्या पार्ट्या रंगताना दिसून येत आहेत. या गंभीर बाबींकडे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष्य होत असून, त्यांच्याच आशीर्वादाने भिडेवाडा मद्यपी व जुगाराचा अड्डा बनत चालला आहे. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी आता खर्‍या अर्थाने पोलिस आणि महापालिका प्रशासनाकढून कठोर कायदेशीर पावले उचलण्याची गरज आहे.

भिडे वाड्याची पाहणी करून त्याचा मास्टर प्लॅन तयार केला जाईल. त्यापूर्वी वाड्याची पाहणी करणे गरजेचे आहे. पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक यांचा सहभाग आराखडा तयार करताना घेतला जाईल. वाडा वारसास्थळांच्या यादीत असल्याने आता कसली अडचण येणार नाही.
हर्षदा शिंदे, हेरिटेज विभागप्रमुख (अभियंता, महापालिका )

या भागात पोलिसांची रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. संशयितरीत्या कुणीही आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. जुगार आणि मद्यपींवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. हा परिसर संवेदनशील असून, चौकशीत जादा भर दिला जात आहे.
राजेंद्र लांडगे, (पोलिस निरीक्षक) फरासखाना पोलिस स्टेशन

लोकप्रतिनिधींना लक्ष द्यायला वेळ नाही…
प्रशासनाचे या वाड्याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. माध्यमांनी यासंबंधी वारंवार वार्तांकन केले मात्र प्रशासन, पुणे महानगरपालिका यावर ठोस काही करताना दिसून येत नाही. भिडे वाडा असलेल्या ठिकाणच्या वॉर्डात स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने राहतात. मात्र त्यांचे तर दुर्लक्ष झाले आहेच, मात्र इतर लोकप्रतिनिधींनाही याकडे लक्ष द्यायला वेळ नाही.

देशातील पहिली मुलींची शाळा असलेल्या भिडेवाड्याची दिवसेंदिवस अतिशय दुरवस्था होऊ लागली आहे. मुलींची पहिली शाळा म्हणजेच पुण्यातील भिडेवाडा सध्या दारूचा अड्डा बनला आहे. येथे पाहणी केल्यानंतर अनेक धक्कादायक आणि संतापजनक बाबी उघडकीस आल्या आहेत. दारूच्या बाटल्या, वेफर्सची पाकिटे, सिगारेटची थोटके अशा वस्तूंचा खच वाड्यात पाहायला मिळत आहे. हे कमी की काय अक्षरश: बिछानाही या ठिकाणी दिसून आला आहे. तर दोरीवर वाळत घातलेले कपडेही निदर्शनास आले आहेत.

त्यामुळे शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारा हाच का तो ऐतिहासिक भिडेवाडा, असा सवाल आपल्या मनात आल्याशिवाय राहात नाही. पुणे महापालिकेचे देखील याकडे दुर्लक्ष झाले आहे. या वाड्यातील खोल्यांमध्ये रात्रीच्या अंधारात कोणी येत जात असेल तरी कळणार नाही इतका इथे अंधार असतो. केवळ फुले जयंती, पुण्यतिथीला महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला इथे हार अर्पण केला जातो. इतर दिवस मात्र कुणी ढुंकूनही भिडेवाड्याकडे लक्ष देत नसल्यानं आज मुलींची ही पहिली शाळा दारूचा अड्डा बनला आहे.

महापालिकादेखील या ऐतिहासिक वास्तूकडे दुर्लक्ष करीत असल्याचे यातून दिसून येत आहे. दरम्यान, हा वाडा ज्या परिसरात आहे, त्याच ठिकाणी पुणे महापालिकेचे प्रतिनिधी देखील राहतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीही भिडेवाड्याकडे पाठ फिरवली असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

राष्ट्रीय स्मारकाबाबत घोषणा : पावसाळी अधिवेशनात स्त्री शिक्षणाचे उगमस्थळ अर्थातच भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक होणार असल्याची घोषणा माजी पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली होती. त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही याची काळजी सरकार घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

स्मारकाचा आराखडा तयार करण्यासाठी नामवंत कलाकारांकडून कल्पना मागवण्यात येतील, अशा घोषणा बापट यांनी अधिवेशनात केल्या होत्या. मात्र, त्या अद्यापही पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे स्मारकाबाबतच्या घोषणा हवेतच विरत असल्याचे दिसून
येत आहे.

Dnyaneshwar: