पुणे | Pune News – गणेश एक परंतु त्याची रूप अनेक… सरस्वतीच्या दरबारातील गणेश पिंडीला अभिषेक घालणारा गणेश नर्तक, गणेश पूजक, गणेश शिवतांडवाच्या मुद्रेतील गणेश, तर बालरूपातील मनमोहक गणेश अशा शेकडो गणेशाच्या मूर्ती शोभून रूपाचे दर्शन घडवत राष्ट्रसंचार आयोजित ‘मेकिंग ऑफ बाप्पा विथ आई’ शाडूच्या गणेश मूर्ती कार्यशाळेला उदंड प्रतिसाद मिळाला. पुणे शहरातील विविध शाळांमधून सुमारे 500 हून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी यामध्ये उत्साहपूर्ण प्रत्यक्ष सहभाग घेऊन ही कार्यशाळा प्रचंड यशस्वी केली.
सिंहगड स्प्रिंग डेल स्कूलच्या एरंडवणे येथील कॅम्पसमध्ये सकाळी नऊ वाजता या कार्यशाळेचा प्रारंभ झाला. सुरुवातीला सहभागी पालकांनी गणेश स्तोत्र म्हणून वातावरणामध्ये भावुक्ता आणि पावित्र्यता आणली. त्यानंतर सर्वांना शाडूच्या मातीचे तयार गोळ, आईस्क्रीम स्टिक्स, पाणी आणि मूर्ती बनवण्यासाठीचा बेस पुठ्ठा देण्यात आला. प्रशिक्षक विद्या रेपाळ यांनी एका एका स्टेपने गणेश मूर्ती बनविण्याची कला सादर केली. त्यानंतर त्यांनी हातामध्ये पुठ्ठा घेऊन गणेश मूर्ती कशी बनवायची याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले, ते पाहून सर्वांनी मुर्त्या बनविण्याला प्रारंभ केला.
पाच ते सोळा वर्ष वयोगटातील मुला मुलींनी त्यांच्या आईसोबत प्रत्यक्ष सहभागी होऊन कार्यशाळेमध्ये खूप उत्साह दाखवला. मूर्ती बनविण्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची उत्कंठा वाढत जात होते. जशी जशी मूर्ती घडत होती तस तसे मूर्तीचे भाव आणि विद्यार्थी व पालकांच्या चेहऱ्यावरील भाव देखील बदलत होते. आपण काहीतरी साकारतोय आणि ते आपल्या हातून घडतंय याचा एक वेगळाच आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवत होता. गणेश मूर्ती बनवायला क्लिष्ट आणि अवघड वाटत असली तरी अत्यंत सोप्या, सहज आणि बाळबोध शब्दांमध्ये प्रशिक्षकांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे नवशिके असलेली सर्व मुले सहजगत्या या मूर्ती बनवत होते.
सुमारे दोन ते अडीच तासाच्या कालावधीमध्ये गणरायाच्या विविध आरत्या आणि सुमधुर गीतांच्या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण सुरू होते. अडीच तासानंतर प्रत्येकाने अत्यंत सुबक अशी आखीव रेखीव मूर्ती साकारत ‘बाप्पा विथ आई’च्या सेल्फी पॉईंट समोर प्रत्येकाने त्या मूर्तीचे सादरीकरण केले. आणि आपल्या बाप्पा सोबत फोटोही घेतला.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना राष्ट्र संचारच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामुळे मुलांना काहीतरी आपण घडविण्याचा आणि त्याची कुणीतरी दखल घेतल्याचा ही एक वेगळा आनंद मिळाला. अनेक पालकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. या उपक्रमात सलग दोन वर्ष सहभागी झाल्याचा आम्हाला आनंद होत असल्याची प्रतिक्रिया देताना पालकांच्या आनंदाला उधाण आले होते.
यावेळी अनेक पालकांनी राष्ट्र संचारच्या कार्यशाळेत बनवलेल्या गणेश मूर्तीचीच प्राणप्रतिष्ठा येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये घरी करणार असल्याचे आवर्जून सांगितले. अनेकांनी येथेच या गणेश मूर्ती रंगविल्या, तसेच आकर्षक केल्या.