कोथरूड मतदारसंघात ‘गणपती रंगवा’ स्पर्धा

केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण देशाचा आत्मा

पुणे : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेले नवीन शैक्षणिक धोरण हा देशाचा आत्मा असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. गणेशोत्सवकाळात लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोथरूड मतदारसंघात ‘गणपती रंगवा स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोथरूडमधील अनेक बालमित्रांनी सहभाग घेतला. यातील उत्कृष्ट बालकलाकारांना शुभारंभ लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री शर्वरी जेमेनीस, भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस ॲड. वर्षाताई डहाळे‌, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पाटील म्हणाले की, “आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुकुल शिक्षण पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व होते. या पद्धतीमुळे आपल्या मुलांना सर्व कलांचे शिक्षण मिळत होते. मात्र, ब्रिटिशांनी ही शिक्षण पद्धती मोडीत काढली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर माननीय मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने कौशल्याभिमुख शिक्षण देणारी ही शिक्षण पद्धत आणली असून, केंद्र सरकारचे हे नवं शैक्षणिक धोरण देशाचा आत्मा आहे. ज्यामुळे आपल्या मुलांमधील कलागुणांना वाव मिळण्यासह सर्वांगिण विकास होईल.” ते म्हणाले की, “आज आपल्या पुणे शहरात अशी अनेक ठिकाणे आहेत. जी आताच्या तरुण पिढीलाही माहिती नाहीत. त्यामुळे आगामी काळात ही सर्व ठिकाणे शोधून त्यांची नवीन पीढिला ओळख व्हावी, या उद्देशाने लहान मुलांसाठी ‘मामाच्या गावाला जाऊ या!’ नावाने छोटी सहल आयोजिली जाईल असेही सांगितले.

सिनेअभिनेत्री शर्वरी जेमेनीस म्हणाल्या की, “श्रीगणेश ही विद्येच्या देवतेसह ६४ कलांचा अधिपती आहे. प्रत्येक माणसामध्ये एक कलाकार दडलेला असतो आणि ही कलाच त्या माणसाला शेवटपर्यंत साथ देते. त्यामुळे आपल्यातील कला ओळखण्यासाठी एक व्यासपीठ मिळणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्याची प्रतिमा लहान मुलांनी रंगवावी ही अतिशय अभिनव कल्पना आहे. दादांसारखे व्यक्तिमत्त्व असे व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.

Sumitra nalawade: