मुंबई : (Gauri Bhide On Uddhav Thackeray) समोर आलेल्या माहितीनुसार, अभय भिडे यांच्या वडिलांनी प्रभादेवीला सिद्धिविनायक मंदिरासमोरच्या इंडस्ट्रीअल इस्टेटमध्ये राजमुद्रा नावाचा प्रिंटिंग प्रेस सुरू केला. त्यावेळी महापालिकेची बहुतांश कामे अशोक प्रिंटिंग प्रेसला मिळत. ती आपणास मिळावी, अशोक प्रेसला मिळू नयेत यासाठी भिडे यांनी खूप खटाटोप केले होते, अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरु आहे. भिडे स्टँडिंग कमिटीच्या सदस्यांना जाऊन भेटत. हा १९७३/७५ चा काळ असावा. पण, अशोक प्रेसशी असलेले कंत्राट तोडणे वा त्यांची कामे काढून राजमुद्राला देणे शक्य नव्हते.
पालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यावर भिडे अधिक सक्रिय झाले. त्यांना काही कामे मिळाली, पण सर्व देणे शक्य नव्हते, अशी चर्चा सेनेच्या वर्तुळात सुरु आहे. काही काळ मार्मिकचे अंक भिडे आपल्या प्रेसमध्ये छापून देत. पण, तरीही पालिकेची सारी कामे त्यांना तेव्हाही मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांचा शिवसेनेवर व उद्धव ठाकरे यांच्यावर राग होता, अशी माहिती शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात येते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी आणि चिरंजीव आदित्य व तेजस यांनी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी संपत्ती जमवली असल्याचा ठपका ठेवत, दादरमधील गौरी भिडे व त्यांचे वडील अभय भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका केली होती. न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर बुधवारी प्राथमिक सुनावणी झाली. मात्र, याचिकेबाबत काही त्रुटी असल्याचे आक्षेप न्यायालयाच्या रजिस्ट्रीने नोंदवले असल्याने ते आक्षेप दोन आठवड्यांत दूर करण्यास भिडेंना सांगून खंडपीठाने १६ नोव्हेंबरला सुनावणी ठेवण्यात आली.