स्वतःला ओळखा; रडण्यात नाही, तर लढण्यात खरी मजा आहे

सिमोन द बोव्हुआर यांनी ’द सेकंड सेक्स’ नावाच्या पुस्तकात एक वाक्य सांगितलं आहे की, ’स्त्री ही घडत नाही, तिला घडवली जाते’. या वाक्याला न्याय देणार्‍या आणि स्वतःच स्वतःला घडवणार्‍या अनेक स्त्रिया या समाजात आहेत. अनुभव, परिस्थिती आणि समाजाने त्यांना घडवलं आहे. अशाच एक, परिस्थितीवर मात करीत, शिक्षणाच्या जोरावर एक उत्तम शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणार्‍या ’अनिता पवार’. यांचे मूळ गाव सातारा असून, त्यांचे प्राथमिक शिक्षण हे सातारा येथील “कन्या शाळेतच” झाले. आई-वडील, चार बहिणी आणि दोन भाऊ असं त्यांचं कुटुंब. त्यांचं दहावीचं शिक्षण पूर्ण झालं आणि लग्न झालं.

नृत्य, कला, वक्तृत्व, अभिनय, लेखन, क्रीडा अशा क्षेत्रांत त्यांनी शालेय जीवनात यश मिळवले होते, परंतु लग्नानंतर शिक्षण थांबल्यामुळे मनाची घुसमट वाढली होती आणि एक क्षण असा आला की, सगळे पाश तोडून त्यांनी उंबरा ओलांडून, कायद्याने मुलांचा ताबा घेतला. विभक्त राहून आपल्या मुलांची आई आणि बाप या भूमिका बजावत शिकत राहिल्या. १९९७ मध्ये पुण्यात आल्या, तेव्हा अंगावर फक्त एक साडी होती. समोर असंख्य प्रश्न होते. अशा परिस्थितीत एक निवारा मिळाला. कर्वेनगर येथील “महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या ’श्रीमती सुषमा देशपांडे’ यांनी ’मेट्रन’ पोस्टवर ठेवून घेतले. अशा संघर्षमय खडतर प्रवासातही त्यांनी हार मानली नाही. बी.ए., एम.ए. (मराठी), एम.ए. (सोशिओलॉजी), एम. एड., डी.एस.एम., एम. फील., करून सध्या त्या पुणे विद्यापीठात पीएच.डी. (एज्युकेशनमध्ये) करीत आहेत.

सर्व शिक्षण त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहत पूर्ण केलं. त्यांना अनेक ठिकाणी अध्यापनाचा अनुभवदेखील आहे. उदा- “मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूल”ला शिक्षण घेत कामाला लागल्या. सर्वशिक्षा अभियान, पुणे म.न.पा, स्पायसर बी. एड. कॉलेज, इ. २००८ पासून त्या,”महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत”, कर्वेनगर येथे, पार्वतीबाई अध्यापिका विद्यालयात,”अध्यापकाचार्या” म्हणून कार्यरत आहेत. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करण्याची प्रचंड आवड आहे. चित्रपट, नाटक, कविता, गीतलेखन, बालनाट्य लेखन सुद्धा त्या उत्तम करतात. उत्तम वक्तृत्व, सुंदर हस्ताक्षर, रांगोळी अशा अनेक कला त्यांनी अवगत केल्या आहेत. अनिता युवा पिढीतील प्रत्येक मुलीला आणि स्त्रीला सांगू इच्छितात की, “स्त्री ही एक महान शक्ती आहे. स्वतःला ओळखा, रडण्यात नाही, तर लढण्यात खरी मजा आहे’. रणरागिणी व्हा, प्रत्येक स्त्रीला मदत करा.”

Nilam: