काँग्रेसला मोठ्ठा धक्का! गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा

नवी दिल्ली | Ghulam Nabi Azad Resigns – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज (26 ऑगस्ट) पक्षाला रामराम ठोकला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी 16 ऑगस्टला जम्मू जम्मू काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा देत आपल्या नाराजीचे संकेत दिले होते. त्यानंतर अखेर आज त्यांनी राजीनामा देत पक्षाला मोठा धक्का दिला आहे.

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचं राजीनामा पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी लिहिलं आहे की, “अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावूक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचं माझं 50 वर्षांचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे”. तसंच भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस जोडो यात्रा काढावी, असा सल्लाही गुलाम नबी आझाद यांनी दिला आहे.

पुढे गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पत्रात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. “तुमच्या नेतृत्वाखाली पक्ष चांगली कामगिरी करत आहे. पण दुर्दैवाने राहुल गांधी यांचा पक्षप्रवेश झाल्यापासून, विशेषत: 2013 नंतर तुम्ही राहुल यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर, त्यांनी पक्षातील चर्चेची संपूर्ण ब्लू प्रिंटच उद्ध्वस्त करुन टाकली आहे. सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला करण्यात आलं. तर अननुभवी नेते पक्षाचा कारभार पाहू लागले,” असं देखील त्यांनी लिहिलं आहे.

Sumitra nalawade: