पुणे : (Girish Bapat meeting On Kasba Byelection) प्रकृती अस्वस्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून दूर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट हे अखेर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच गिरीश बापट यांनी तब्येत ठीक नसल्याचे कारण देत कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते.
मात्र, कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई सुरु असल्याने गिरीश बापट आजारपण बाजुला सारून आपल्या पक्षासाठी प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. ते गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता नारायण पेठेतील केसरीवाडा येथे कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह कमालीचा दुणावला आहे.
कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी दुहेरी लढत रंगणार आहे. गेली अनेक वर्षे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, यंदा भाजपने कसब्यातून ब्राह्मणेतर उमेदवार दिल्याने येथील ब्राह्मण समाज नाराज आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक भाजपला अवघड जाण्याची चिन्हे आहेत.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता कसब्यातील सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. कालच देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज गिरीश बापट यांनी अनपेक्षितपणे कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कसब्यातील आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात गिरीश बापट भाजपच्या कार्यकर्त्यांना विजयासाठी कोणता कानमंत्र देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.