पुणे | Girish Bapat Passed Away – पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचं आज (29 मार्च) निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. तसंच त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अशातच बापट यांची प्रकृती अचानक खालावल्यानं त्यांना दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तसंच बापट यांच्या पार्थिवावर संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
गिरीश बापट यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. विशेष म्हणजे बापट यांची प्रकृती खालावलेली असतानाही त्यांनी कसबा पोटनिवडणुकीत प्रचार केला होता.
1973 पासून गिरीश बापट राजकारणात सक्रिय होते. त्यांचं पुण्यात भाजपची यशस्वी वाटचाल करण्यात मोठं योगदान होतं. त्यामुळे पुण्याची ताकद अशी त्यांची ओळख होती. तसंच आता त्यांच्या निधनानं भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
बापट यांची राजकीय कारकिर्द
गिरीश बापट 1973 ला टेल्को कंपनीत कर्मचारी म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर 1983 ला ते पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. नगरसेवक म्हणून ते सलग तीनवेळा निवडून आले होते. तसंच 1993 ला कसबा पोटनिवडणुकीत बापट यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर 1995 पासून ते कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. तसंच 2019 ला ते पुण्याचे खासदार म्हणून सर्वाधिक मतांनी निवडून आले होते.