पुणे | शहरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिलांचे जीवनमान व त्यांची सुरक्षितता हा मोठा प्रश्न आहे. अनेकजणी व्यथित, कुंठित आयुष्य जगत आहेत. छेडछाड व त्यातून होणारा मानसिक त्रास ही अत्यंत गंभीर समस्या महाविद्यालयीन तरुणी, महिलांसमोर उभी ठाकत आहे. दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात मूळच्या पश्चिम बंगाल येथील एका तरुणीचा रिक्षा चालकानेच विनयभंग केल्याची घटना गुरुवारी पुणे विद्यापीठात घडला आहे.
पीडित तरुणी ही 18 वर्षांची असून ती मूळची पश्चिम बंगालची आहे. ती शिक्षणासाठी पुण्यात आली होती. कोथरूड एमआयटी कॉलेजपासून पुणे विद्यापीठाकडे सचिन नावाच्या अनोळखी रिक्षा चालकाच्या रिक्षामधून जात होती. या प्रवासादरम्यान या रिक्षा चालकाने रिक्षा पुणे विद्यापीठामध्ये थांबवत तिचा हात पकडला आणि जवळीक साधत तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. झालेला प्रकार तरुणीने चतुशृंगी पोलिसांना सांगितल्यानंतर आरोपी रिक्षा चालकावर चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, या तरुणीने रिक्षा चालकाला विरोध करत रिक्षामधून बाहेर उडी मारली. मात्र, तरी देखील त्याने जबरदस्तीने तिचा मोबाईल घेऊन त्याचा स्वतःचा नंबर तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून दिला. या प्रकरणी चतुशृंगी पोलीस पुढील तपास करत आहेत.