सध्या सगळीकडे लगीनघाई सुरु झाल्याचे बघायला मिळत आहे. तुळशी विवाह आटोपताच लग्नसोहळ्यांना सुरुवात होते. परंतु दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकरी नवरदेव उपेक्षित राहत असल्याचे चित्र दिसत आहे. लग्न करताना नोकरी – व्यावसाय करणारे, महिना पगार (वेतन) घरी आणणारे नवरदेवांना पसंती मिळत असल्याने शेतकरी नवरदेवांना घर कारभारीण मिळणे कठीण झाले आहे.
मावळ तालुक्यात झाली आहे. त्यामुळे उपवर मुला-मुलींसह स्थळ शोधण्याच्या कार्यक्रमाला वेग आला आहे. ग्रामीण भागात मध्यस्थींच्या माध्यमातून उपवर वधू शोधण्यासाठी आप्तेष्ट, नातेवाईकांना विचारणा होऊ लागली आहे. मात्र ग्रामीण भागातील वधु मुलींच्या अपेक्षा देखील खुप वाढल्या असल्याने शेतकरी मुलांची चांगलीच कुचंबणा होत असून मुलगी मिळणे कठीण झाले आहे.
अलीकडे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुली सुशिक्षित झाल्या असल्याने त्यांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. उच्चशिक्षित नोकरी, निर्व्यसनी, घरंदाज, कमविता वर मिळावा, अशी त्यांची इच्छा असते. शेतकरी, शेतमजूर वरांना त्यांच्याकडून नाक मुरडली जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील लग्नाळूंना कारभारीण मिळणे सोपे राहिले नाही.
वधू-वर सूचक केंद्रांमध्ये नोंदणी वाढली
पूर्वी ग्रामीण भागातील तरुण वधू-वर सूचक केंद्रांमध्ये सहसा नोंदणी करीत नव्हते. मात्र, आता वधू मिळत नसल्याने समाजातील वधू-वर सूचक केंद्रामध्ये नोंदणी वाढली आहे. शेतकरी वरबाप देखील नातेवाइकांना, मुलासाठी एखादी मुलगी पाहता का, असा सूर आळवित आहेत.
फसवणुकीच्या प्रमाणात वाढ
लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने ग्रामीण भागात अनेक तरुणांची फसगत होण्याचे प्रमाणही वाढले आहे. फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रीय झाल्या असून पैसे, दागिने घेऊन लग्नानंतर वधू फरार होण्याचे प्रमाण वाढले आहे.