विकास आराखड्यात फेरीवाल्यांना प्राधान्य द्या

शक्तिमान घोष यांची मागणी

राष्ट्रीय फेरीवाला सन्मान मेळावा

फेरीवाल्यांचे झाले सर्वेक्षण

संपूर्ण भारत देशामध्ये चार कोटींपेक्षा अधिक फेरीवाले आहेत, फेरीवाले हे सर्वसामान्य लोकांना स्वस्तात सेवा उपलब्ध करून देतात, त्यांच्यासाठी आपल्या लढाईतून कायदा झालेला आहे.

पिंपरी-चिंचवड : एकीकडे कायद्याची अंमलबजावणी सुरू असताना देशात व महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिकांनी त्यांच्या शहर विकास आराखड्यामध्ये कायद्यानुसार अडीच टक्के जागा या राखीव ठेवाव्यात, असे निर्देश आहेत. त्याचे पालन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने करावे, असे मत नॅशनल हॉकर फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव शक्तिमान घोष यांनी व्यक्त केले.

नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज निगडी येथे राष्ट्रीय फेरीवाला सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांचा सन्मान, शासनाचे प्रमाणपत्र व कोरोना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.

अध्यक्षस्थानी कामगारनेते काशिनाथ नखाते होते. झारखंडहून आलेल्या राष्ट्रीय महिला महासचिव अनिता दास, समन्वयक मॅकेंझी डाबरे, महाराष्ट्राचे सचिव विनिता बाळेकुंद्री, जनआंदोलनाचे युवराज गतकळ, प्रदेश सचिव अनिल बारवकर, इरफान चौधरी, वृषाली पाटणे, माधुरी जलमुलवार, बिलाल तांबोळी, समाधान जावळे, बाळासाहेब सातपुते, सुशेन खरात, सय्यद अली, नंदा तेलगोटे, जरिता वाठोरे, सुखदेव कांबळे, संभाजी वाघमारे, वहिदा शेख, फरीद शेख आदींसह राज्य व शहरातील विक्रेते बहुसंख्येने उपस्थित होते.

घोष म्हणाले, की फेरीवाला व्यवसायामध्ये महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. महिला आणि पुरुषांना याचा समान संधी, समान जागा मिळणे गरजेचे आहे. फेरीवाल्यांना कार नको, बंगला नको, घर नको, फक्त त्यांना व्यवसायासाठी आरक्षित जागा द्या. देशभरामध्ये बिर्ला, अंबानी, अदानी, मफतलाल अशा श्रीमंतांचा जागांवर डोळा असून यांसारख्या अनेक लोकांचे मॉल आहेत. याचा परिणाम होत असून रोजगार निर्माण करण्यावर मोठे आक्रमण होत आहे.

काशिनाथ नखाते यांच्या पाठीशी कायम आम्ही उभे राहू. रस्त्यावरील लढाईसह कायदेशीर लढाईसाठी आपण सर्वांनी सज्ज राहावे. अनिता दास यांनी देशभरामध्ये विविध ठिकाणी झालेले सर्वेक्षण व मिळालेल्या प्रमाणपत्र, तसेच निर्माण झालेल्या जागांबाबत माहिती दिली व महिलांना प्रोत्साहन दिले.

मॅकेंझी डाबरे म्हणाले, की संघटनेतून शक्ती निर्माण होते आणि ही शक्ती फेरीवाला व कामगार यांच्या कल्याणासाठी वापरून योग्य नियोजन करावे. विनिता यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये दौरे करून फेरीवाल्यांचे प्रश्न जाणून भविष्यात लढाई करणार असल्याचे नमूद केले. अनिल बारवकर यांनी प्रस्तावना केली. संजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले. किरण सडेकर यांनी आभार मानले.

Sumitra nalawade: